नंदू गुरव
राधानगरी : सह्याद्रीच्या घनदाट जंगलात वसलेल्या दाजीपूर परिसरात निसर्ग, इतिहास आणि श्रद्धेबरोबरच अनोखे भौगोलिक वैशिष्ट्य पाहायला मिळते. दाजीपूर (ता. राधानगरी) येथील उगवाई देवी मंदिर हे केवळ धार्मिक स्थळ नसून वैशिष्ट्यपूर्ण भौगोलिक रचनेमुळेही पर्यटकांचे आकर्षण ठरत आहे. मंदिराच्या छपरावर पडणारे पावसाचे पाणी दोन वेगवेगळ्या दिशांनी प्रवास करते. एका बाजूने वाहणारे पाणी पश्चिम दिशेला जाऊन कोकणातील जलप्रवाहांमध्ये मिसळते आणि अरबी समुद्राला जाऊन मिळते. दुसर्या बाजूने वाहणारे पाणी पूर्वेकडे प्रवाहित होऊन कृष्णा नदीच्या खोर्यात मिसळते आणि बंगालच्या उपसागराकडे प्रवास करते. सह्याद्रीच्या जलविभाजक रेषेवर असलेल्या भागाची भौगोलिक रचना महत्त्वाची भूमिका बजावते.
दगडी बांधकामाचा मजबूत पाया आणि वैशिष्ट्यपूर्ण छत असलेले हे मंदिर श्रद्धेचे केंद्र आहे. दाजीपूर अभयारण्याच्या निसर्गरम्य वातावरणात वसल्याने येथे येणार्या भाविकांना धार्मिक अनुभूतीसोबतच सह्याद्रीचे सौंदर्य अनुभवता येते. पावसाळ्यात दाजीपूर परिसर हिरवाईने नटतो. धुके, डोंगररांगा, घनदाट जंगल आणि उगवाई देवी मंदिराचे हे अनोखे वैशिष्ट्य यामुळे पर्यटक व निसर्गप्रेमींसाठी हे ठिकाण आकर्षणाचे केंद्र बनले आहे. सह्याद्रीच्या कुशीत दडलेले उगवाई देवी मंदिर हे निसर्गाच्या अद्भुत रचनेचा आणि स्थानिक श्रद्धेचा सुंदर मिलाफ असल्याचे मानले जाते.
देवीचा तीन वर्षांनी भव्य गोंधळ
दाजीपूर येथील श्री उगवाई देवी ही हसणे, दाजीपूर आणि फोंडा या तीन गावांची ग्रामदैवत मानली जाते. या देवीचा पारंपरिक गोंधळ सोहळा दर तीन वर्षांनी भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा होतो. यासाठी ग्रामस्थांसह मुंबई व राज्याच्या विविध भागांतून भाविक मोठ्या संख्येने गावात दाखल होतात. हजारो भक्तांच्या उपस्थितीत देवीची पारंपरिक पूजा, गोंधळ, धार्मिक विधी आणि नवसपूर्तीचे कार्यक्रम पार पडतात.