

कोल्हापूर : कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात पावसाचा जोर बुधवारीदेखील काहीसा कमी होता. यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत संथगतीने वाढ सुरू आहे. पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत दिवसभरात ८ इंचांची वाढ होऊन पातळी रात्री १२ वाजता ३६ फूट १० इंचांवर होती. पुराचे पाणी रस्त्याच्या एका बाजूने गायकवाड वाड्याजवळ आले आहे. गेल्या २४ तासांत राधानगरी, आजरा, मलिग्रे या गावांसह १४ धरण क्षेत्रांत अतिवृष्टी झाली. गेल्या ८ तासांमध्ये हा जोर काहीसा ओसरला होता. राधानगरी धरण ५६.४६ टक्के भरले आहे. हवामान विभागाने जिल्ह्याला गुरुवारीदेखील ‘यलो अलर्ट’ कायम ठेवला आहे.
शहरात पावसाची उघडझाप सुरू होती. सायंकाळनंतर पावसाचा जोर वाढला होता. शहरात सायंकाळी ७ नंतर पुन्हा पावसाच्या सरी कोसळत होत्या. यामुळे सखल भागांत पाणीच पाणी झाले होते. पंचगंगा नदीची पाणी पातळी मंगळवारी रात्री १२ वाजता ३६ फूट २ इंचांवर होती. बुधवारी रात्री १२ वाजता ती ३६ फूट १० इंचांवर पोहोचली. परिणामी, पंचगंगेच्या पुराचे पाणी शिवाजी पूल ते गायकवाड यांच्या पुतळ्याजवळ सरकू लागले होते.
चार बंधारे झाले खुले; ५७ पाण्याखालीच
पावसाचा जोर ओसरल्याने दिवसभरात ४ बंधारे खुले झाले. कडवी नदीवरील कोपार्डे, तुळशी नदीवरील आरे, बाचणी, शाळी नदीवरील येळाणे बंधारा खुला झाला. अद्याप ५७ बंधारे पाण्याखाली असून त्यावरील वाहतूक पर्यायी मार्गाने सुरू आहे.