Kolhapur Flood: धरणक्षेत्रात पाऊस मंदावला, तरीही कृष्णा-पंचगंगेला महापुराचा धोका; कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांत स्थिती गंभीर

Krishna Panchganga flood risk latest news: कृष्णा-पंचगंगेच्या पाणीपातळ्यात झपाट्याने वाढ, पूरस्थिती गंभीर, कुरुंदवाड बस्तवाड रस्त्यावर पाणी बस्तवाडचा संपर्क तुटला
Kolhapur Flood
Kolhapur FloodPudhari Photo
Published on
Updated on

कुरुंदवाड: कोयना आणि वारणा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने काहीशी उसंत घेतली असली, तरी नद्यांच्या पाणीपातळीत होणारी वाढ थांबलेली नाही. राधानगरी धरणातून विसर्ग वाढल्याने आणि कर्नाटकातील अलमट्टी धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडले जात असले तरी, कृष्णा आणि पंचगंगा नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे.

कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांतील पूरस्थिती अधिकच गंभीर बनली असून, नदीकाठच्या गावांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. शिरोळ तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला असून, कुरुंदवाडमधील वस्त्यांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.

धरणांमधील विसर्गाचे गणित

एकीकडे कोयना आणि वारणा धरणांमधून होणारा विसर्ग कमी करण्यात आला असला, तरी दुसरीकडे राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडल्याने एकूणच नदीप्रवाहांवर मोठा परिणाम झाला आहे. धरणाचा स्वयंचलित दरवाजा क्रमांक ५ उघडल्याने, एकूण पाच दरवाज्यांतून ७,१४० क्युसेक आणि पॉवर हाऊसमधून १५०० क्युसेक असा एकूण ८,६४० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरणातून होणारा विसर्ग ९५,३०० क्युसेकवरून कमी करून ८२,१०० क्युसेक करण्यात आला आहे. विसर्गात मोठी घट करत तो १५,३६९ क्युसेकवर आणण्यात आला आहे. धरणात १,७१,७५६ क्युसेक पाण्याची आवक होत असून, तब्बल २,५०,००० क्युसेक पाणी पुढे सोडले जात आहे. यामुळे सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील फुगवटा कमी होण्यास मदत अपेक्षित आहे.

नदीकाठच्या गावांना पुराचा वेढा

धरणांमधून विसर्ग कमी होऊनही नद्यांची पाणीपातळी वाढतच चालली आहे. याचा थेट फटका शिरोळ तालुक्यातील गावांना बसला आहे. कुरुंदवाड-बस्तवाड रस्त्यावर कृष्णा नदीचे पाणी आल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद झाला आहे. यामुळे बस्तवाड गावाचा संपर्क तुटला आहे. कुरुंदवाड येथील गोठणपूर परिसरातील कोरवी गल्ली आणि शिकलगार वसाहतीत पंचगंगा नदीचे पाणी शिरले आहे. प्रशासनाने तातडीने कार्यवाही करत येथील १० ते १२ कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केले आहे.

पुढील काही तास महत्त्वाचे

अलमट्टी धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडले जात असले तरी, पाणलोट क्षेत्रातून येणारा प्रवाह आणि स्थानिक पाऊस यामुळे नद्यांच्या पाणीपातळीत चढ-उतार सुरूच आहेत. प्रशासन हाय अलर्टवर असून, नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि आवश्यकतेनुसार सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पुढील २४ तास या दोन्ही जिल्ह्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत.

नद्यांच्या पाणीपातळीची सद्यस्थिती

प्रमुख पुलांवरील पाणीपातळी:

  • कराड पूल: ३४ फूट ६ इंच (धोक्याखाली)

  • ताकारी पूल: ५४ फूट ८ इंच (धोक्याच्या पातळीपेक्षा ८ फूट जास्त)

  • आयर्विन पूल (सांगली): ४२ फूट ३ इंच

  • नृसिंहवाडी यादव पूल: ५७ फूट

    पंचगंगा नदीवरील बंधाऱ्यांची स्थिती:

  • तेरवाड बंधारा: ६१ फूट १ इंच

  • शिरोळ बंधारा: ५९ फूट ११ इंच

  • रुई बंधारा: ६९ फूट ४ इंच

  • इचलकरंजी बंधारा: ६५ फूट ४ इंच

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news