

कोल्हापूर : पंधरा दिवसांतील मान्सूनपूर्व पावसाने जिल्ह्यातील भाजीपाल्याचे उत्पादन कोलमडले आहे. शेतातील भाजीपाल्याला पावसाचा तडाखा बसल्याने सध्या बाजारात फळभाजी, पालेभाजीची आवक मंदावली आहे. त्यामुळे दोन आठवड्यांत भाज्यांच्या दरात प्रतिकिलो तब्बल चार ते पाचपटींनी वाढ झाली आहे. रोजच्या जेवणात लागणार्या भाजीसाठीही आता सर्वसामान्य कुटुंबाला मंडईत गेल्यावर रोज दोनशे रुपयांची नोट खर्चावी लागत आहे. आवक वाढून दर आवाक्यात येण्यासाठी अजून महिनाभर कळ सोसावी लागणार आहे.
मे महिन्याच्या सुरुवातीला कोल्हापूर जिल्ह्याला वळवाच्या जोरदार सरींनी झोडपून काढले. मे च्या दुसर्या पंधरवड्यापासून मान्सूनपूर्व पावसाने तब्बल 15 दिवस ठिय्या ठोकला. पंचगंगेची पाणी पातळी वाढली. पूरसद़ृश परिस्थिती निर्माण झाली. वळवाच्या पावसाने मान्सूनसारख्या पावसाचे रौद्र रूप घेतल्याने शेतमालावर परिणाम झाला. यामध्ये वाफ्यात तयार झालेल्या भाजीपाला काढण्याआधीच पाण्याने वेढल्याचे चित्र होते. पंधरा दिवसांपूर्वी पावसामुळे बसलेल्या फटक्याचे परिणाम आता बाजारात भाजीपाल्याच्या वाढलेल्या दरांमधून तीव—पणे जाणवू लागले आहेत. यामध्ये पालेभाज्याची आवक मोठ्या प्रमाणात घटली असून कांदा, टोमॅटो, कोथिंबिरीसह फळभाज्यांच्या दरातही प्रचंड वाढ झाली आहे.
पंधरा दिवसांपूर्वी टोमॅटो दहा रुपये किलोने विकला जात होता, तो आज 60 रुपये किलोच्या घरात गेला आहे. फ्लॉवरचा एक गड्डा 25 रुपयांवरून 80 रुपयांवर पोहोचला आहे. वांगी, ढोबळी मिरची, दोडका, श्रावण घेवडा, भेंडी, बिन्स, वरणा यांच्या किमती दोन आठवड्यांपूर्वी 50 रुपये किलो होत्या. त्या आता 180 ते 200 रुपये किलोच्या भावाने खरेदी कराव्या लागत आहेत. कांदा, बटाट्यालाही पावसाने फटका दिला असून कांदा 15 रुपये किलोवरून 25 ते 30 रुपये किलो झाला आहे. बटाट्याचा भाव 40 ते 50 रुपये किलो झाला आहे. पालेभाज्यांमध्ये मेथी, पालक, तांदळी, आंबाडा, कांदापात दहा रुपयांवरून 40 रुपये प्रतिपेंडी झाली आहे.