

कोल्हापूर : शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेला प्रत्येक किल्ला शिवभक्तांसाठी वंदनीय आहे. यामुळे शिवछत्रपतींच्या स्वराज्याची राजधानी रायगड किल्ल्यावर शिवराज्याभिषेकासाठी जमणार्या लाखो शिवभक्तांनी ‘माझा किल्ला-माझी जबाबदारी’ म्हणून गडाचे पावित्र्य राखण्यासाठी सोहळा शिस्तबद्ध पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष संभाजीराजे यांनी केले.
महाराष्ट्र क्रिकेट असो.च्या पत्रकार परिषदेच्यानिमित्ताने त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी रागयडावर प्रतिवर्षीप्रमाणे 5 लाखांच्यावर शिवप्रेमी उपस्थित राहाणार आहेत. शिवभक्तांच्या सोयी-सुविधांसाठी राज्य शासन, स्थानिक जिल्हा प्रशासन आणि रायगड प्राधिकरणाकडून विविध उपाय-योजना करण्यात येणार आहे.
बीड जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था बिघडली आहे. कायदा धाब्यावर बसवून मारहाणीचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केले जात आहेत. यावर उपाययोजना म्हणून मुख्यमंत्री, पालकमंत्री सर्व पक्षीय लोकप्रतिनिधी यांनी कायदा- सुव्यवस्था राखण्यासाठी तातडीने प्रयत्न करण्याची सूचना त्यांनी केली.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्वराज्य पक्षाच्या सहभागाबद्दल ते म्हणाले. स्वराज्य पक्षाला झालेल्या निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. यातून पक्षातील अनेक चुका, उणीवा दिसल्या आहेत. त्या दूर करण्याबरोबरच सध्या निवडणुकांपेक्षा समाजकारण व प्रामाणिक लोकसेवेला प्राधान्य देणार आहे.
रायगडावर शिवछत्रपतींच्या समाधीजवळ असणार्या वाघ्या कुत्र्याचा पुतळा हाटविण्याची मागणी शिवप्रेमींकडून होत आहे; मात्र हातावर मोजण्याइतक्या लोकांकडून याला विरोध होत आहे. याबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा झाली असून डाव्या व उजव्या आणि समांतर विचारसरणीच्या लोकांची तातडीने समिती निर्माण करून यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे संभाजीराजे यांनी सांगितले.