

कोल्हापूर : साजणी (ता. हातकणंगले) येथे बनावट हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (एचएसआरपी) तयार करून विक्री करणार्या साई रेडियम आर्ट दुकानावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने बुधवारी छापा टाकला. यामध्ये वेगवेगळ्या क्रमांकांच्या 33 एचएसआरपी नंबरप्लेटसह अॅम्बॉस मशिन, स्टिकर, पत्रा असा सुमारे चार लाखांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी संतोष बबन यादव (31, रा. यादव गल्ली, साजणी) याला अटक केली आहे. त्याच्यावर हातकणंगले पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
याबाबतची माहिती अशी, शासनाकडून एप्रिल 2019 पूर्वीच्या सर्व वाहनांना एचएसआरपी नंबरप्लेट बसविणे अनिवार्य केले आहे. अशा परिस्थितीत साजणी येथे बस स्टॉपसमोर साई रेडियम आर्ट नावाच्या दुकानात बनावट एचएसआरपी नंबर प्लेट बनवून त्याची बेकायदेशीर विक्री सुरू असल्याची माहिती पोलिस अंमलदार नवनाथ नाईक यांना मिळाली. त्यानुसार पथकाने बुधवारी दुकानावर छापा टाकला. यावेळी साहित्य मिळून आले.
पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण, सहा. पोलिस निरीक्षक सागर वाघ, पोलिस उपनिरीक्षक शेष मोरे, पोलिस अंमलदार नवनाथ कदम, रामचंद्र कोळी, परशुराम गुजरे, सुरेश पाटील, रुपेश माने, विनोद कांबळे, अरुण धनगर यांनी कारवाई केली.
नंबरप्लेट खरेदी केलेल्यांवरही कारवाई
नियमबाह्य आणि मुदत संपलेल्या वाहनांना पाचशे ते हजार रुपयांना बनावट नंबरप्लेटची विक्री सुरू होती. 20 ते 25 वर्षांपूर्वीच्या वाहनांना नंबर प्लेट बसविण्याचा खर्च अधिक आहे. त्यामुळे अशा वाहनांसाठी संशयित संतोष गेल्या चार महिन्यांपासून अशा नंबर प्लेटची विक्री करत आहे. नंबर प्लेट बनवून घेतलेल्यांवरही कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.