Gokul Election | विरोधकांना आताच ‘पी. एन.’ गटाचा पुळका का आला?

राहुल पाटील यांचा सतेज पाटील यांना टोला
कोल्हापूर : गोकुळ दूध संघ निवडणुकीत महायुतीच्या प्रचारार्थ करवीर तालुक्यातील ठरावधारकांच्या मेळाव्यात बोलताना जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील, आ. चंद्रदीप नरके. समोर उपस्थित ठरावधारक.
कोल्हापूर : गोकुळ दूध संघ निवडणुकीत महायुतीच्या प्रचारार्थ करवीर तालुक्यातील ठरावधारकांच्या मेळाव्यात बोलताना जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील, आ. चंद्रदीप नरके. समोर उपस्थित ठरावधारक.
Published on: 
Updated on: 

कोल्हापूर : दिवंगत आमदार पी. एन. पाटील यांचा गट अडचणीत असताना आम्हाला सोडून विरोधकांसोबत गेला. आता त्याच विरोधकांना आमच्या गटाचा पुळका का आला? असा सवाल करत शेवटच्या टप्प्यात विरोधकांकडून अफवा पसरवल्या जातील. पण पी. एन. पाटील यांची शपथ घेऊन सांगतो, महायुतीच्या सर्व उमेदवारांना पॅनेल टू पॅनेल मतदान करू, अशी ग्वाही जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील यांनी दिली.

‘गोकुळ’ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी कोल्हापुरात झालेल्या करवीर तालुक्यातील ठरावधारकांच्या मेळाव्यात ते बोलत होते. वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ प्रमुख उपस्थित होते. आमदार चंद्रदीप नरके म्हणाले, गेल्या पाच वर्षांत उच्चांकी दूध दरवाढ देत असतानाच पारदर्शी कारभाराच्या माध्यमातून उलाढाल ४२०० कोटींपर्यंत नेली आहे. घरात भांड्याला भांडे लागल्यानंतर आवाज येतो. त्यामुळे महायुतीमध्ये जागावाटपावरून थोडे वर खाली झाले असेल. माझ्या जीवनात संघर्ष नवा नाही. कॉलेज जीवनापासून संघर्ष सुरू असून संजय मंडलिक म्हटल्याप्रमाणे मी काही चाणक्य नाही. पॅनेलमध्ये चार जागा मिळाल्या, त्यातील विश्वास पाटील यांची एक आणि उर्वरित तीन जागा मी पळून रना काढून घेतल्या आहेत. त्यामध्ये मला कोणी रनआऊट केले नाही. गेल्या दोन दिवसांपासून मला फोन येत आहेत. मी त्यांना सांगितले असे काही होणार नाही. हालसिद्धनाथाला जाऊन आलोय. त्यामुळे आत-बाहेर काही होणार नाही, पॅनेल टू पॅनेल मतदान होईल.

वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, करवीरमध्ये प्रत्येक वेळी काहीतरी गडबड होत असल्याचा डाग आहे. या पॅनेलची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी माझ्यावर सोपवली आहे. काही झाले तर माझी अब्रू जाईल. जागा वाटपात पी. एन. पाटील यांच्या गटाला एकच जागा मिळाली. बाळासाहेब खाडे यांनी आपण थांबून नेत्याला संधी दिली. या गटाला पाच वर्षे स्वीकृत पद तर देणार आहेच, जिल्हा बँकेतही सन्मान करू.

‘गोकुळ’चे माजी संचालक बाळासाहेब खाडे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी ‘गोकुळ’चे माजी अध्यक्ष विश्वास पाटील, अजित नरके, माजी खासदार संजय मंडलिक, शौमिका महाडिक यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी आमदार अमल महाडिक, माजी आमदार संजय घाटगे, राजेश पाटील, जिल्हा बँकेचे संचालक ए. वाय. पाटील आदी उपस्थित होते. अजित पाटील यांनी आभार मानले.

ठराव गोळा करताना सर्वाधिक जखमा मलाच

ठराव गोळा करताना बरेच युद्ध झाले. यामध्ये सर्वाधिक जखमा मलाच झाल्या, असे सांगत शौमिका महाडिक, तुम्हाला वहिनी नाही, सूनबाईच म्हणतो, असे माजी अध्यक्ष विश्वास पाटील यांनी सांगितले.

चंद्रदीप, ठरावधारक बाहेर काढा...

चंद्रदीप नरके हे हुशार आणि चिकट आहेत. ठरावधारकांना ते हलवणार नाहीत, काहीतरी मिमिक्री करणार असल्याचे सांगत आहेत. पण, तसे करू नका. माणसे बाहेर काढा, त्यांच्या शपथा घेतल्या पाहिजेत, असे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news