Rahul Patil | राहुल पाटलांचा २५ ऑगस्टला राष्ट्रवादीत प्रवेश ! अजित पवारांच्या उपस्थितीत होणार भव्य सोहळा

राधानगरी तालुक्यातील अनेक निष्ठावंत नेत्यांनी काँग्रेससोबतच राहण्याचा केला निर्धार
Rahul Patil |
राहुल पी. एन. पाटीलPudhari File Photo
Published on
Updated on

Rahul Patil

गुडाळ : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, दिवंगत आमदार पी. एन. पाटील यांचे सुपुत्र राहुल पाटील (सडोलीकर) हे आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) प्रवेश करणार असल्याचे निश्चित झाले आहे. येत्या २५ ऑगस्ट रोजी करवीर तालुक्यातील सडोली खालसा येथील भव्य पटांगणावर, जिथे स्वर्गीय पी. एन. पाटील यांच्यावर अंत्यसंस्कार झाले, त्याच भावनिक ठिकाणी हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे. मात्र, राहुल पाटील यांच्या या निर्णयामुळे पी. एन. पाटील गटात फूट पडल्याचे चित्र स्पष्ट झाले असून, राधानगरी तालुक्यातील अनेक निष्ठावंत नेत्यांनी काँग्रेससोबतच राहण्याचा निर्धार केला आहे.

अजित पवारांच्या उपस्थितीत होणार भव्य पक्षप्रवेश

राहुल पाटील यांनी मंगळवारी राधानगरी तालुक्याच्या दौऱ्यावर असताना गुडाळ येथे पत्रकारांना ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, "उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा होणार आहे." कार्यकर्त्यांच्या हितासाठी आणि विकासाच्या राजकारणासाठी आपण हा निर्णय घेत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या पक्षप्रवेशासाठी सडोली येथील ज्या मैदानात पी. एन. पाटील पंचतत्वात विलीन झाले, तेच ठिकाण निवडल्याने या सोहळ्याला एक भावनिक किनार लाभली आहे.

एकीकडे प्रवेश, दुसरीकडे नाराजीनाट्य

राहुल पाटील यांच्या या निर्णयाने पी. एन. पाटील गटातील सर्वजण सहमत नाहीत. विशेषतः राधानगरी तालुक्यात या निर्णयावरून तीव्र नाराजी पसरली आहे. भोगावती साखर कारखान्याचे तीन विद्यमान संचालक आणि अनेक ज्येष्ठ नेत्यांनी राहुल पाटील यांच्या भूमिकेला विरोध दर्शवला आहे. त्यांनी थेट कोल्हापुरात जाऊन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज (बंटी) पाटील यांची भेट घेतली आणि आपण काँग्रेस पक्ष सोडणार नसल्याचे ठामपणे सांगितले. गटात पडलेली ही उभी फूट सांधण्यासाठी आणि नाराज कार्यकर्त्यांची समजूत काढण्यासाठी राहुल पाटील यांनी मंगळवारी राधानगरी तालुक्याचा दौरा केला. त्यांनी गुडाळ, कसबा तारळे, कांबळवाडी, खिंडी व्हरवडे या गावांमध्ये जाऊन प्रमुख कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या.

या दौऱ्यात त्यांनी भोगावतीचे विद्यमान संचालक अभिजित पाटील (गुडाळ), रवींद्र पाटील (कसबा तारळे), माजी चेअरमन संजयसिंह पाटील, माजी संचालक दत्तात्रय हरी पाटील यांच्यासह अनेक प्रमुख नेत्यांशी चर्चा केली. यावेळी त्यांच्यासोबत भोगावतीचे चेअरमन प्रा. शिवाजीराव पाटील आणि गोकुळचे माजी संचालक पी. डी. धुंदरे उपस्थित होते, जे त्यांच्या निर्णयाला पाठिंबा देत आहेत.

एकंदरीत, राहुल पाटील यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने कोल्हापूरच्या राजकारणात, विशेषतः काँग्रेसमधील समीकरणांमध्ये मोठा बदल घडणार आहे. एका बाजूला राहुल पाटील आपल्या समर्थक कार्यकर्त्यांसह नव्या राजकीय प्रवासाला सुरुवात करत आहेत, तर दुसरीकडे त्यांच्या वडिलांचे अनेक निष्ठावंत सहकारी काँग्रेसमध्येच थांबले आहेत. त्यामुळे आगामी काळात पी. एन. पाटील गटाचे राजकीय भवितव्य काय असेल आणि या फुटीचा जिल्ह्याच्या राजकारणावर काय परिणाम होईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news