kolhapur | मजुरीवाढीचा प्रश्न मार्गी लावू; कारखाने बंद ठेवणे पर्याय नाही : आ. राहुल आवाडे

बिमे कापल्याने तणाव : यंत्रमागधारकांचा आज मेळावा
इचलकरंजी : खर्चीवाले यंत्रमागधारकांशी चर्चा करताना माजी मंत्री प्रकाश आवाडे, आ. राहुल आवाडे.
इचलकरंजी : खर्चीवाले यंत्रमागधारकांशी चर्चा करताना माजी मंत्री प्रकाश आवाडे, आ. राहुल आवाडे.
Published on
Updated on

इचलकरंजी : खर्चीवाल्या यंत्रमागधारकांच्या मजुरीवाढीचा प्रश्न सध्या ऐरणीवर आला असला, तरी उद्योगधंदे आणि कारखाने बंद ठेवणे हा पर्याय होऊ शकत नाही. त्यामुळे कापड व्यापार्‍यांशी (ट्रेडींगधारकांशी) व्यक्तिगत पातळीवर चर्चा करून हा प्रश्न मार्गी लावू, अशी ग्वाही आमदार राहुल आवाडे व माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी दिली.

दरम्यान, आंदोलनासंदर्भात यंत्रमागधारकांचा रविवारी (10 मे) सकाळी 11 वाजता चंदूर येथील मलाबादे भवनमध्ये मेळावा घेऊन पुढील निर्णय घेऊ, अशी माहिती शहाजी भोसले व नंदकुमार लोखंडे यांनी दिली. खर्चीवाल्या यंत्रमागधारकांच्या मजुरीवाढीप्रश्नी आंदोलन सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी पॉवरलूम असोसिएशनमध्ये झालेल्या बैठकीत गोंधळ झाला होता. शनिवारी काही सुरू असलेले कारखाने बंद पाडण्याचा प्रयत्न झाला. काही ठिकाणी थेट कारखान्यात घुसून बिमे कापल्याच्या घटनाही घडल्या. यामुळे दिवसभर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

सायंकाळी चंदूर परिसरातील खर्चीवाले यंत्रमागधारकांनी आ. राहुल आवाडे यांची भेट घेतली. मागील 13 वर्षांपासून मजुरीवाढीचा प्रश्न प्रलंबित असून, त्यावर योग्य तो तोडगा काढावा, अशी मागणी करण्यात आली. यावेळी आ. आवाडे व प्रकाश आवाडे यांनी यंत्रमागधारकांशी चर्चा केली. इचलकरंजीसारख्या औद्योगिक शहराला बंद परवडणारा नाही. शहरातील औद्योगिक शांतता बिघडल्यास त्याचे दूरगामी परिणाम सर्वांनाच भोगावे लागतील. त्यामुळे कारखाने बंद ठेवण्याऐवजी व्यापार्‍यांशी चर्चा करून मार्ग काढावा, असे त्यांनी सांगितले. यावेळी बाळासाहेब कलागते, अमृत भोसले, चंद्रकांत पाटील, रफिक खानापुरे, शहाजी भोसले, नंदकुमार लोखंडे, योगेश वाघमारे आदींसह खर्चीवाले यंत्रमागधारक उपस्थित होते.

यंत्रमागधारकांच्या सवलतींसाठी प्रयत्न

यंत्रमागधारकांना आवश्यक असलेल्या सवलतींसाठी शासन स्तरावर प्रयत्न करण्यात येतील. तसेच मजुरीवाढीसंदर्भात प्रत्येक ट्रेडींगधारकाशी स्वतंत्र चर्चा करून प्रश्न सोडविण्यासाठी आपण स्वतः पुढाकार घेऊ. गरज पडल्यास माजी मंत्री प्रकाश आवाडे हेही प्रयत्नशील राहतील, अशी ग्वाही आ. आवाडे यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news