राधानगरी धरणक्षेत्रात पावसाची संततधार ! १९ दिवसांत ५८१ मि.मी. पावसाची नोंद, धरण ५९% भरले
Kolhapur Rain Update
राशिवडे : राधानगरी धरणक्षेत्रात गेल्या एकोणीस दिवसांपासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे ५८१ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. या जोरदार पावसामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली असून, धरण सध्या ५९ टक्के भरले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून धरणातून भोगावती नदीपात्रात प्रतिसेकंद अडीच हजार घनफूट (क्युसेक) पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे, त्यामुळे नदीचे पाणी अनेक ठिकाणी पात्राबाहेर पडले आहे.
गेल्या चोवीस तासांत धरणक्षेत्रात ८६ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. अभयारण्याच्या परिसरातही मोठ्या प्रमाणात पाऊस बरसत असल्याने धरणातील पाण्याची आवक वेगाने वाढत आहे. संभाव्य पावसाचा अंदाज आणि उपलब्ध पाणीसाठा लक्षात घेऊन प्रशासनाने धरणातून नियंत्रित पद्धतीने पाण्याचा विसर्ग करण्याचा निर्णय घेतला आहे.
भोगावती नदीपात्रात सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे आणि अधूनमधून उघडझाप करत कोसळणाऱ्या पावसामुळे नदीकाठच्या सतरा बंधाऱ्यांवर पाणी आले आहे, त्यामुळे ते वाहतुकीसाठी बंद झाले आहेत. प्रशासनाकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात असून, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

