

मुदाळतिट्टा : पुढारी वृत्तसेवा
जी चूक माझ्याकडून झाली त्याबद्दल मी हात जोडून माफी मागतो; पण तुम्ही मोठ्या मनाचे आहात, ज्यांना सगळे तुम्ही दिले. आमदार केला, सगळं काही देऊनसुद्धा केवळ माझ्याच नाही, तर तुमच्या छातीवर वार करायला लागला आहे. सगळे दिल्यावरसुद्धा शिवसेना नावाच्या आईवर वार करणार्या माणसा, तू लाचार झालास म्हणजे राधानगरीकर लाचार होणार नाहीत, असा टोला आमदार प्रकाश आबिटकर यांचे नाव न घेता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लगावला. आदमापूर (ता. भुदरगड) येथे बाळूमामा मंदिरानजीक राधानगरी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार के. पी. पाटील यांच्या प्रचार प्रारंभप्रसंगी आयोजित मेळाव्यात ठाकरे बोलत होते. खा. शाहू महाराज, तेजस ठाकरे, आ. मिलिंद नार्वेकर, अरुण दुधवडकर, जिल्हाध्यक्ष विजय देवणे, संजय पवार, करवीरचे उमेदवार राहुल पाटील उपस्थित होते.
ठाकरे म्हणाले, जो कोणी आदानीला मदत करतो, मोदी, शहा यांची पालखी वाहतो तो महाराष्ट्राचा दुश्मनच आहे. राधानगरी मतदारसंघ या गद्दाराला गाडल्याशिवाय राहणार नाही. ज्यांनी गद्दारी केली त्याचे नामोनिशान हटवल्याशिवाय राधानगरीकर स्वस्थ बसणार नाहीत. तुमची ज्यांनी साथ सोडली, त्यांना साथ देऊ नका. आता के. पी. पाटील यांना आमदार करा. उमेदवार के. पी. पाटील म्हणाले, आबिटकर नावाचं नवं पीक आलं आणि या गद्दार आमदाराने राधानगरी मतदारसंघाचे नाव धुळीस मिळविले. पाटगाव धरणाचे पाणी आदानीला विकणारा हा गद्दार आमदार अदानीचा बगलबच्चा आहे. त्याचा बदला घेण्यासाठी आता मशाल पेटवूया. आ. सतेज पाटील म्हणाले, अनेकांनी मांडीला मांडी लावून काम केले; पण लाचारी आणि चौकशीच्या भयापोटी ठाकरेंना सोडण्याचे पाप केले; मात्र जनता त्यांना सोडणार नाही. भोगावतीचे माजी अध्यक्ष संजय पाटील, शरद पाडळकर, प्रकाश पाटील, विजयसिंह मोहिते यांनी मनोगत व्यक्त केले. व्यासपीठावर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, प्रा. अनिल घाटगे, आर. के. पोवार, सुशील पाटील, जयवंतराव शिंपी धैर्यशील पाटील, सदाशिवराव चरापले, हिंदुराव चौगले, विश्वनाथ पाटील, प्रा. किसन चौगुले, अभिजित तायशेटे, पी. डी. धुंदरे, प्रा. सुनील शिंत्रे, संभाजी भोकरे, उपस्थित होते.
के. पी. पाटील यांच्या प्रचारानिमित्त महाराष्ट्रातील पहिली आदमापूरच्या बाळूमामा मंदिराच्या परिसरात उद्धव ठाकरेंची ही सभा ऐकण्यासाठी कार्यकर्त्यांनी अलोट गर्दी केली होती. सभागृहाबाहेर स्क्रीन उभारल्या होत्या.
अजूनही न्यायालयाकडून आपल्याला न्याय मिळाला नाही. म्हणून मी तुमच्याकडे न्याय मागायला आलोय. मी माझ्यासाठी लढत नाही. मी तुमच्यासाठी लढतोय. महाराष्ट्रासाठी लढतोय, असेही ठाकरे म्हणाले.