Radhanagari Dam
Radhanagari DamCanva

Radhanagari Dam | राधानगरीत पर्यटकांच्या हुल्लडबाजीला चाप; एकाच दिवशी ५५ पर्यटकांवर कारवाई; ३३ हजार रुपयांचा दंड वसूल

Radhanagari Dam | पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या राधानगरी तालुक्यात निसर्गाचा आनंद घेण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या बेशिस्त आणि हुल्लडबाज वर्तनाला आळा घालण्यासाठी राधानगरी पोलिसांनी कठोर पावले उचलली आहेत.
Published on

राशिवडे (पुढारी वृत्तसेवा):

पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या राधानगरी तालुक्यात निसर्गाचा आनंद घेण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या बेशिस्त आणि हुल्लडबाज वर्तनाला आळा घालण्यासाठी राधानगरी पोलिसांनी कठोर पावले उचलली आहेत.

Radhanagari Dam
Kolhapur Rain News |जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला

रविवारी, पोलिसांनी राऊतवाडी धबधबा आणि काळम्मावाडी धरण परिसरात एक विशेष मोहीम राबवून हुल्लडबाजी करणाऱ्या ५५ मोटारसायकलस्वारांना चांगलाच दणका दिला. त्यांच्याकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी तब्बल ३३ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. इतकेच नव्हे, तर मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या एका चालकावर कडक कारवाई करत त्याच्याकडून १० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.

सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने राधानगरीच्या निसर्गरम्य सौंदर्याचा अनुभव घेण्यासाठी राज्यभरातून पर्यटक मोठ्या संख्येने येत आहेत. विशेषतः सुट्टीच्या दिवशी राऊतवाडी धबधबा आणि काळम्मावाडी धरण परिसर पर्यटकांच्या गर्दीने फुलून जातो. मात्र, या गर्दीत काही उत्साही पर्यटक वाहतुकीचे नियम पायदळी तुडवत असल्याचे आणि हुल्लडबाजी करून शांततेचा भंग करत असल्याचे चित्र वारंवार दिसत होते.

यामध्ये एका मोटारसायकलवर तीन जण बसणे (ट्रिपल सीट), भरधाव वेगाने आणि धोकादायक पद्धतीने गाड्या चालवणे, कर्णकर्कश हॉर्न वाजवणे आणि मद्यपान करून धिंगाणा घालणे यांसारख्या प्रकारांमुळे इतर पर्यटकांना आणि स्थानिक नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता.

Radhanagari Dam
Sword attack | पूर्ववैमनस्यातून तलवार हल्ला; 5 जणांना अटक

या वाढत्या तक्रारींची आणि संभाव्य धोक्याची दखल घेत राधानगरी पोलिसांनी रविवारी या बेशिस्त पर्यटकांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला. पोलिसांनी धबधबा आणि धरण क्षेत्राकडे जाणाऱ्या प्रमुख मार्गांवर नाकाबंदी केली आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रत्येक वाहनावर कारवाई करण्यास सुरुवात केली.

या धडक मोहिमेदरम्यान, पोलिसांनी ५५ मोटारसायकलस्वारांना नियमभंग करताना पकडले. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करत एकूण ३३,००० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. या कारवाईत मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवून स्वतःचा आणि इतरांचा जीव धोक्यात घालणाऱ्या एका चालकालाही पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्यावर मोटार वाहन कायद्यानुसार कडक कारवाई करत तब्बल १०,००० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. पोलिसांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे हुल्लडबाज पर्यटकांचे धाबे दणाणले असून, या कारवाईचे सुज्ञ पर्यटकांकडून आणि स्थानिकांकडून मोठ्या प्रमाणात स्वागत होत आहे.

"पर्यटनाचा आनंद घ्या, पण नियमात राहून"

राधानगरी पोलिसांनी पर्यटकांना आवाहन केले आहे की, "निसर्गाचा आनंद घेण्यासाठी सर्वांचे स्वागत आहे, परंतु हा आनंद घेताना कायद्याचे आणि नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. कोणत्याही प्रकारची हुल्लडबाजी, मद्यपान करून वाहन चालवणे किंवा इतरांच्या शांततेत अडथळा आणणारे वर्तन खपवून घेतले जाणार नाही. असे प्रकार आढळल्यास यापुढेही कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल," असा स्पष्ट इशारा पोलिसांनी दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news