

गुडाळ: राधानगरी विधानसभा मतदार संघातील उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया आजपासून (दि.२२) सुरू झाली आहे. सकाळी अकरा ते दुपारी तीन या अर्ज दाखल करण्याच्या मुदतीत तहसीलदार कार्यालयाची दारे सर्वसामान्य नागरिकांना बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतल्याने नागरिकांची सलग आठवडाभर गैरसोय होणार आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करणे, अर्जांची छाननी आणि उमेदवारी अर्जांची माघार ही सर्व प्रक्रिया राधानगरी तहसीलदार कार्यालयात पार पडणार आहे. 29 ऑक्टोबरपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत असून 30 ऑक्टोंबर रोजी उमेदवारी अर्जांची छाननी आहे. म्हणजे या कालावधीत दुपारी तीन पर्यंत सर्वसामान्यांसाठी तहसीलदार कार्यालया ची दारे बंदच राहणार आहेत.
राधानगरी तालुका हा विस्ताराने मोठा आणि दुर्गम डोंगराळ भागात पसरलेला आहे. तहसीलदार कार्यालय अंतर्गत दुय्यम निबंधक कार्यालय, संजय गांधी निराधार योजना कार्यालय, पुरवठा विभाग आदी विभागांतर्गत कार्यालयात असलेल्या कामासाठी सर्वसामान्य नागरिकांना तालुक्याच्या ठिकाणी यावे लागते.
दुपारपर्यंत कामे आटोपून आपल्या गावी पोहोचण्यास संध्याकाळ होते. विशेषतः वाकी घोल, म्हासुर्ली, धामणी खोऱ्यातील जनतेला तालुक्याला कामासाठी ये -जा करण्यात पूर्ण दिवस खर्ची घालावा लागतो. प्रशासनाच्या या निर्णयामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोर जावे लागणार आहे.
वास्तविक तहसीलदार कक्षातच निवडणूक अधिकाऱ्यांचे कार्यालय असल्यामुळे अन्य विभागात ये जा करण्यास नागरिकांना निर्बंध घालण्याची कोणतीही आवश्यकता नव्हती. मात्र, सरसकट नागरिकांना दुपारी तीन पर्यंत तहसीलदार कार्यालयाच्या आवारात प्रवेश बंदी केल्याने सलग नऊ दिवस सर्व सामान्य नागरिकांची मोठी गैरसोय होणार आहे.
याबाबत प्रतिक्रियेसाठी निवडणूक निर्णय अधिकारी हरीश सूळ आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अनिता देशमुख यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.