

गुडाळ: मंगळवारी होणाऱ्या राधानगरी पंचायत समिती सभापती - उपसभापती निवडीच्या पार्श्वभूमीवर गैबी तिट्टा येथील जेनेसिस इन्स्टिट्यूट मध्ये काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक संपन्न होऊन सभापती उपसभापती निवडीचे अधिकार काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. सतेज पाटील यांना देण्यात आले.
सोमवारी सायंकाळी जेनेसिस इन्स्टिट्यूट मध्ये राष्ट्रीय काँग्रेसच्या नवनिर्वाचित सहा पंचायत समिती सदस्यांची बैठक काँग्रेसच्या प्रमुख नेते मंडळींच्या उपस्थितीत झाली. या बैठकीस केडीसीसी बँकेचे संचालक ए वाय पाटील, गोकुळचे माजी संचालक पीडी धुंदरे, भोगावतीचे माजी चेअरमन सदाशिवराव चरापले, भोगावतीचे माजी संचालक ए डी पाटील, जि प चे नूतन सदस्य अभिजीत तायशेटे, सागर धुंदरे, सौ. संयोगिता मोरे, भोगावतीचे व्हा.चेअरमन राजाराम कवडे, संचालक धीरज डोंगळे,रवींद्र पाटील,मानसिंगराव पाटील, बिद्रीचे संचालक रणधीर मोरे,माजी संचालक नेताजीराव पाटील आदी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
सर्व नूतन सदस्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर बैठकीचा वृत्तांत जिल्हाध्यक्ष आ.सतेज पाटील यांना कळवून सभापती उपसभापती निवडीची नावे निश्चित करण्याचे अधिकार त्यांना देण्यात आले. सकाळी दहा वाजता उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी अजिंक्यताऱ्यावरून बंद लखोट्यातून नावे पाठवली जाणार असल्याचे सांगण्यात आले. सभापतीपदी आर. वाय. पाटील यांना तर उपसभापती पदी सौ अश्विनी चंद्रकांत चौगले यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.