

Radhanagari Accident |
गुडाळ : वळणाचा अंदाज न आल्याने राधानगरीहून कोल्हापूरला भरधाव वेगात जाणारी इको व्हॅन डोंगर उतारावरून थेट दोनशे फूट दरीत कोसळली. ही दुर्घटना खिंडी व्हरवडे घाटात गुरुवारी (दि.७) सायंकाळी पाच वाजता घडली. सुदैवाने गाडीतील तिन्ही तरुणांना काहीही गंभीर इजा झाली नाही. एक तरुण जखमी झाला तर इतर दोन तरुणांना मुक्का मार बसला.
याबाबत माहिती अशी की, कोल्हापूरातील रंकाळा परिसरातील तीन तरुण इको व्हॅनमधून कोकणातून कोल्हापूरला येत होते. खिंडी व्हरवडे घाटमाथ्यावर संघर्ष अकॅडमी जवळ असलेल्या धोकादायक वळणावर गाडीचा ताबा सुटला आणि गाडी थेट डोंगर उतारावरून दरीत गेली. दरीतील झाडात व्हॅन अडकल्यामुळे जीवितहानी टळली.
संघर्ष अकॅडमीच्या विद्यार्थी आणि शिक्षकांच्या समोरच ही दुर्घटना घडल्याने त्यांनी तातडीने दरीकडे धाव घेत तिन्ही तरुणांना गाडीतून बाहेर काढून मुख्य रस्त्यावर आणले. रुग्णवाहिकेला कॉल करून तिन्ही तरुणांना कोल्हापूरमधील सीपीआर रुग्णालयात पाठवण्यात आले. तरुणांची नावे समजू शकली नाहीत. राधानगरी पोलीसांनी घटनास्थळी भेट देऊन अपघाताचा पंचनामा केला.