

कोल्हापूर : जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. यामुळे धरणात येणाऱ्या पाण्याचे प्रमाणही कमी होत असले तरी जिल्ह्यातील धरणांत संथ गतीने वाढ सुरूच आहे. सोमवारी सकाळी आठ वाजेपर्यंत राधानगरी धरण ९० टक्क्यांहून अधिक भरले. जिल्ह्यातील प्रमुख १७ धरणांत आतापर्यंत ६९.८६ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. थेट पाईपलाईनद्वारे कोल्हापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या काळम्मावाडी (दूधगंगा) धरणाचा पाणीसाठाही ५४ टक्क्यांवर गेला आहे.
जिल्ह्यात यावर्षी जून महिन्यात समाधानकारक पाऊस झाला नाही. जुलै महिन्यातही फारसा अपेक्षित पाऊस बरसला नाही. या दोन महिन्यांत सरासरीच्या ६० टक्क्यापर्यंतच पाऊस झाला आहे. पाऊस कमी प्रमाणात झाल्याने धरणातील पाणीसाठाही गतीने वाढलेला नाही. दूधगंगा धरणात जुलै संपत आला तरी अद्याप ५४ टक्केच साठा झाला आहे. त्या तुलनेत राधानगरी धरणात चांगला पाणीसाठा झाला आहे.
चार धरणे पूर्ण भरली
जिल्ह्यातील प्रमुख १७ पैकी घटप्रभा, जांबरे, सर्फनाला आणि कोदे ही चार धरणे यापूर्वीच पूर्ण क्षमतेने भरली आहे. या धरणांत एकूण २.३ टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. ३.८५ टीएमसी क्षमतेच्या धामणी प्रकल्पात यावर्षीही ३४ टक्के (१.२९ टीएमसी) पाणीसाठा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार या प्रकल्पात १.२९ टीएमसी पाणीसाठा झाला असून, धरणातून सध्या ३ हजार ३९ क्युसेक पाणी सोडले जात आहे.