कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा
गणेश चतुर्थी अवघ्या एक दिवसावर आली आहे. गणेशमूर्तीच्या आगमनासाठी विविध मंडळांनी काढलेल्या मिरवणुका, खरेदीसाठी नागरिकांची गर्दी, त्यातच रस्त्याशेजारी लावलेली वाहने यामुळे शहरात अनेक ठिकाणी वाहतुकीची गुरुवारी कोंडी होऊन वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पर्यायी मार्ग शोधावा, तर गल्लीबोळांतील मंडपांनी रस्ते - अडवले आहेत. या प्रकारांमुळे - शहरवासीयांना मनःस्ताप सहन करावा लागला. वाहने मागे-पुढे घेण्यावरून वाहनचालकांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली.
शनिवारी (दि. ७) गणेश चतुर्थी असली तरी अनेक मंडळांनी गणेशमूर्ती मिरवणुकांनी आणण्यास सुरुवात केली आहे. गुरुवारी दुपारी अनेक मंडळांच्या मिरवणुका बिंदू चौक, लक्ष्मीपुरीसह शहरातून निघाल्या.
आधीच ठिकठिकाणी उभारलेले मंडप, रस्त्यांतील खड्डे, महापालिकेच्या पॅचवर्कच्या कामामुळे वाहतूक खोळंबत आहे. भाऊसिंगजी रोड, पापाची तिकटी, रंकाळा स्टैंड परिसर, संभाजीनगर चौक, सायबर चौक, हॉकी स्टेडियम चौक, मिरजकर तिकटी, बिंदू चौक, व्हीनस कॉर्नर, फोर्ड कॉर्नर,
शाहूपुरीत जाणारे रस्ते, स्टेशन रोड, कावळा नाका सिग्नल, राजारामपुरी जनता बझार चौकामध्ये वाहनांची कोंडी झाली होती. त्यात दिवसभर पावसाची रिपरिप सुरू असल्यामुळे वाहनधारकांसह नागरिक वैतागून गेले होते. सकाळी १० ते दुपारी दीड आणि सायंकाळी साडेपाचनंतर रात्री नऊपर्यंत वाहनांची तोबा गर्दी चौकाचौकांत होती. त्यामुळे वाहतूक कोंडी झाली होती.