Quantum Technology | बँकिंग सुरक्षा ते कर्करोगावर प्रभावी उपचार शोधणारी क्वांटम यंत्रणा येणार

पुढील ८ वर्षांत २० ते १,००० क्युबिट क्षमतेचे क्वांटम संगणक विकसित करण्याचे केंद्र सरकारचे लक्ष्‍य
Quantum Technology |
Quantum Technology | बँकिंग सुरक्षा ते कर्करोगावर प्रभावी उपचार शोधणारी क्वांटम यंत्रणा येणार
Published on
Updated on

आशिष शिंदे

कोल्हापूर : क्वांटम टेक्नॉलॉजीमुळे आज अशक्य वाटणारी अनेक कामे काही क्षणात शक्य होऊ शकतात. बँकिंग यंत्रणा सुरक्षित करणे, कर्करोगासारख्या आजारांवर नवीन औषधे शोधणे, लष्करी संदेश हॅक करणे जवळपास अशक्य करणारी सुरक्षा व्यवस्था तयार करणे, चक्रीवादळ किंवा मुसळधार पावसाचा अधिक अचूक अंदाज वर्तवणे, अशी अत्यंत अवघड कामे क्वाटंम टेक्नॉलॉजीमुळे आता सहज शक्य होणार आहेत. केंद्र सरकारच्या ६ हजार कोटींच्या नॅशनल क्वांटम मिशनअंतर्गत पुढील ८ वर्षांत दोन हजार किलोमीटरपर्यंत सुरक्षित क्वांटम प्रणाली उभारली जाणार आहे.

या प्रकल्पाची प्रमुख जबाबदारी महाराष्ट्रातील प्रतिष्ठित

संस्थांवर सोपवली आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) नंतर आता जगभरात क्वांटम टेक्नॉलॉजीची शर्यत सुरू झाली आहे. केंद्र सरकारच्या ६ हजार कोटींच्या नॅशनल क्वांटम मिशनअंतर्गत पुढील ८ वर्षांत २० ते १,००० क्युबिट क्षमतेचे क्वांटम संगणक विकसित करणे, २ हजार किलोमीटरपर्यंत सुरक्षित क्वांटम संवाद प्रणाली उभारणे (जी हॅक करणे अशक्य असेल), अतिसंवेदनशील सेन्सर्स आणि नवीन क्वांटम पदार्थ विकसित करण्यात येणार आहेत.

नॅशनल क्वांटम मिशन मोहिमेत ४३ संस्था, १७ राज्ये आणि २ केंद्रशासित प्रदेशांतील १५२ संशोधक एकत्र काम करत आहेत. महाराष्ट्रासाठी या मिशनचे महत्त्व अधिक आहे. देशभरात स्थापन करण्यात आलेल्या चार प्रमुख थिमॅटिक हबपैकी क्वांटम सेन्सिंग अँड मेट्रोलॉजी हबची जबाबदारी आयआयटी बॉम्बेकडे सोपविण्यात आली आहे. तर, ‘आयआयएसईआर’ पुणे आणि टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (टीआयएफआर), मुंबई या संस्थाही या महत्त्वाकांक्षी मोहिमेतील प्रमुख आहेत.

अमेरिका, चीन आणि युरोपीय देशांमध्ये क्वांटम तंत्रज्ञानावर अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक सुरू असताना भारतानेही या स्पर्धेत वेग घेतला आहे. केंद्र सरकारच्या आराखड्यानुसार पुढील ८ वर्षांत बहुनोडी क्वांटम नेटवर्क तयार करणे तसेच अणुघड्याळे, अतिसंवेदनशील सेन्सर्स आणि नवीन क्वांटम पदार्थ विकसित करणे ही प्रमुख उद्दिष्टे आहेत.

क्वांटम टेक्नॉलॉजीमुळे क्षणार्धात मिळेल उत्तर

ही अशी अत्याधुनिक संगणक प्रणाली आहे, जी आजच्या संगणकांपेक्षा अनेक पटींनी वेगाने आणि अधिक गुंतागुंतीची कामे करू शकते. अगदी सोप्या भाषेत सांगायचे झाले, तर समजा १० लाख कुलपे आहेत आणि त्यापैकी एकाची चावी शोधायची आहे. साधा संगणक एकेक चावी लावून पाहतो. मात्र, क्वांटम संगणक अनेक चाव्या एकाच वेळी तपासण्याची क्षमता ठेवतो. त्यामुळे जे काम आज तास किंवा दिवस लागून होते, ते भविष्यात काही मिनिटांत किंवा सेकंदांत होऊ शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news