

कोल्हापूर : राज्य सरकारने अंगणवाड्यांमध्ये 3 ते 6 वयोगटातील मुलांसाठी नवा अभ्यासक्रम लागू केला आहे. यात खेळ, गाणी, गोष्टी आणि प्रयोगात्मक शिक्षणावर भर देण्यात येणार आहे. त्यामुळे अंगणवाड्यांत बालकांना आता हसत-खेळत गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळणार असून त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळणार आहे.
राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 नुसार केंद्र सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यानुसार आता देशभरातील अंगणवाड्यांमध्ये 3 ते 6 वयोगटातील बालकांसाठी नवा अभ्यासक्रम लागू करण्यात आला आहे. यासंदर्भात 19 मे रोजी राज्य सरकारने शासन निर्णय जारी केला आहे. केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्रालयाच्या वतीने विकसित केलेला आधारशिला अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून राबविला जाणार आहे.
नवीन अभ्यासक्रम हा आधारशिला बालवाटिका 1 ते 3 या नावाने ओळखला जाणार आहे. अंगणवाड्यांमध्ये या अभ्यासक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी शिक्षकांना आवश्यक ज्ञान, मार्गदर्शन, शैक्षणिक साहित्य, प्रशिक्षण साहित्य अंगणवाडी सेविका आणि पर्यवेक्षिका यांना प्रशिक्षणावेळी उपलब्ध करून दिले जाणार आहे. बारावी उत्तीर्ण अंगणवाडी सेविकांचे पूर्व बाल्यावस्थेमधील संगोपन व शिक्षण यासंदर्भातील सहा महिन्यांचे, तर बारावीपेक्षा कमी शिक्षण असणार्या सेविकांचा एक वर्षाचा पदविका प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे.
नवीन अभ्यासक्रम पारंपरिक शिक्षण पद्धतीपेक्षा वेगळा आहे. यात मुलांना पुस्तकी ज्ञानात अडकवण्याऐवजी खेळत-खेळत शिकवण्यावर भर दिला जाणार आहे. बालकांच्या नैसर्गिक कुतूहलाचा विचार करून शिक्षणपद्धतीची रचना करण्यात आली आहे. गोष्टी, गाणी, गप्पा, निसर्ग निरीक्षण, कला-हस्तकला, छोटे वैज्ञानिक प्रयोग अशा पद्धतींचा वापर शिक्षणासाठी केला जाणार आहे.