

कोल्हापूर : लडाख येथे सहलीला गेल्यानंतर हिमालयाच्या थंडगार वार्यांनी नव्हे, तर हृदयाला भिडणार्या एका अनुभवाने आम्ही सगळे भारावलो . हे शब्द आहेत पुणे येथून लडाख ट्रिपवर गेलेल्या मंदार जोशी यांचे. मंदार हे कृष्णकुमार, भूपेंद्र सिंह आणि केरमन बोधनवाला या तीन मित्रांसमवेत लडाख सहलीला गेले होते. या सहलीचा एक खास टप्पा ठरला तो ‘पुढारी’ वृत्तसमूहाच्या मदतीने साकारलेले सियाचीनमधील हुंदर नुब्रा व्हॅली येथील लष्करी हॉस्पिटलची अविस्मरणीय भेट. 18 जून रोजी या चार मित्रांनी ‘पुढारी’च्या दातृत्वशीलतेचे दर्शन घडवणार्या या हॉस्पिटलमध्ये तीन तास व्यतीत केले आणि एका संवेदनशील अनुभूतीचा स्पर्श घेऊन परतले.
‘पुढारी’ समूहाने पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्या नेतृत्वाखाली सीमेवरील अत्यावश्यक गरज ओळखून लष्करी हॉस्पिटल उभारले. गेली 25 वर्षे ‘पुढारी’कडून सातत्याने मिळणार्या सहाय्यामुळे हे रुग्णालय ‘सियाचीन हीलर्स’ या नावाने ओळखले जाते. अत्याधुनिक वैद्यकीय यंत्रणांसह हे हॉस्पिटल आज सीमावर्ती जवानांचेच नव्हे, तर स्थानिक नागरिकांचेदेखील आधारवड बनले आहे. पुणेस्थित चार मित्रांनी ही भेट अगदी खास प्रयत्नांनी घडवून आणली. या हॉस्पिटलला भेट देण्यासाठी परवानगी आवश्यक असते.
‘पुढारी’ च्या व्यवस्थापनाकडून रितसर परवानगी घेऊन या चारही मित्रांनी सियाचीन लष्करी रुग्णालयात पाऊल ठेवले. तेथील वातावरण पाहून मिळालेले समाधान अनमोल आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. ‘पुढारी’ ही केवळ बातमी पोहोचवणारी संस्था नाही, तर राष्ट्राच्या सीमेलाही स्पर्श करणारी, जवानांच्या दुःखाशी नाते जोडणारी, नि:शब्द पण प्रखर सेवा करणारी एक सामाजिक चळवळ आहे, अशा शब्दात या सर्व मित्रांनी भावना व्यक्त केल्या.