

कोल्हापूर : दै. ‘पुढारी’ टॅलेंट सर्च प्रज्ञाशोध परीक्षा (सर्वांगीण शैक्षणिक विकास अभियान) संपूर्ण मार्गदर्शिकेचे प्रकाशन गुरुवारी सायंकाळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. मीना शेंडकर, दै. ‘पुढारी’चे समूह सरव्यवस्थापक अनिल पाटील यांच्याहस्ते झाले.
यावेळी दै. ‘पुढारी’चे वितरण सरव्यवस्थापक डॉ. सुनील लोंढे प्रमुख उपस्थित होते. जिल्हाभर नावाजलेल्या राधानगरी शिष्यवृत्ती पॅटर्नचे जिल्हा परिषद शिक्षक प्रकाश पाटील (विद्यामंदिर तारळे खुर्द), सुनील कुदळे (विद्यामंदिर मजरे कासारवाडा), साताप्पा शेरवाडे (विद्यामंदिर मजरे कासारवाडा), संदीप वाली (विद्यामंदिर घुडेवाडी), राजेंद्र पाटील (विद्यामंदिर येळवडे), अमर पाटील (विद्यामंदिर आकनूर) यांचे मार्गदर्शिका लेखनासाठी सहकार्य लाभले आहे. हे शिक्षक मार्गदर्शिका प्रकाशन सोहळ्याप्रसंगी उपस्थित होते.
दरम्यान, गेल्यावर्षी झालेल्या पुढारी टॅलेंट सर्च परीक्षेवेळी जिल्हाभरातील विद्यार्थ्यांनी परीक्षा अभ्यासक्रमाच्या पुस्तकाची मागणी केली होती. त्याअनुषंगाने दै. ‘पुढारी’ने इयत्ता 3 री ते 8 वीसाठी परिपूर्ण आणि गुणवत्तापूर्ण अशी ‘पीटीएसई’, प्रज्ञाशोध परीक्षा संपूर्ण मार्गदर्शिका महाराष्ट्रात शिष्यवृत्ती परीक्षांमध्ये नावाजलेला राधानगरी-भुदरगड पॅटर्न, शिष्यवृत्तीची पंढरी अशी ओळख असलेल्या या पॅटर्नमधील तज्ज्ञ व अनुभवी शिक्षकांच्या मार्गदर्शनाने परिपूर्ण अशी मार्गदर्शिका तयार केली आहे. यातील भाषा विषयांतर्गत वाचून कल्पना व संकल्पना स्पष्ट करणे, कार्यात्मक व्याकरण संकल्पना स्पष्ट करणे, भाषेचा व्यवहारात उपयोग, शब्द संपत्तीवरील प्रभुत्व, तर गणित विषयात संख्याज्ञान, संख्यांवरील क्रिया, संकल्पना स्पष्ट करणे, अपूर्णांक, शब्द संपत्तीवरील प्रभुत्व, व्यावहारिक गणित, भूमिती, चित्रालेख माहिती यांचा समावेश आहे.
इंग्रजी विषयामध्ये लेटर्स ऑफ अल्फाबेट, व्हॉकाल्बरी, पंच्युएशन मार्क, न्यूमिरीकल इन्फॉर्मेशन, क्रिएटिव्ह थिंकिंग, स्टॉक एक्स्प्रेशन्स, कॉम्प्रेहेंशन व बुद्धिमत्ता चाचणी विषयांतर्गत आकलन, वर्गीकरण, क्रम ओळखणे, तर्कसंगती व अनुमान, प्रतिबिंब/प्रतिमा, समसंबंध, समान पद ओळखणे, कूटप्रश्न, गटाशी जुळणारे पद, सांकेतिक भाषा, भावनिक व सामाजिक बुद्धिमत्ता आदी प्रकरणे मार्गदर्शिकेत समाविष्ट आहेत.