कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा
ज्या गावात अजून एस.टी. पोहोचलेली नाही, ज्या टोकाला अजून दैनंदिन जगण्यासाठी लागणार्या सुविधांसाठी झगडावे लागते तिथल्या घरातील महिलेला ‘वाच बाई वाच’ या योजनेतून दैनिक ‘पुढारी’ने साद घातली. या अनोख्या संकल्पनेला बचतगटांच्या माध्यमातून महिलांनी एकीचे बळ दिले आणि करवीर तालुक्यातील डोंगरदर्या, वाडीवस्तीतील महिलांच्या हातात दै. ‘पुढारी’ पोहोचला. या योजनेला गावागावांतील भगिनींपर्यंत नेणार्या ‘सीआरपीं’चा माहेरची पैठणी देऊन सन्मान करण्यात आला. शुक्रवारी जिल्हा परिषदेच्या सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी ‘सीआरपीं’च्या योगदानाला कौतुकाची पावती दिली. या कार्यक्रमासाठी पैठणीचे प्रायोजक कोल्हापूर-सांगली रोडवरील हालोंडी येथील ‘चंद्रप्रभा वस्त्रम’ होते.
दै. ‘पुढारी’च्या वतीने करवीर तालुक्यात राबवलेल्या या योजनेमध्ये हजारो महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक सुषमा देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली ‘वाच बाई वाच’ ही योजना सुरू केली होती. अध्यक्षस्थानी जिल्हा अभियान व्यवस्थापिका वनीता डोंगरे होत्या. ग्रामीण भागातील महिलेचा दिनक्रम शेती व घरकामाच्या रहाटगाड्यातच संपतो. आजुबाजूच्या जगातील बातम्या या महिलांपर्यंत पोहोचल्या, तर त्यांच्या ज्ञानात भर पडेल, या हेतूने बचतगटातर्फे या चळवळीला गती देण्यात आली होती. दै. ‘पुढारी’च्या पुढाकाराने, राबणार्या माऊलींच्या हाती वृत्तपत्र पोहोचवण्यासाठी या योजनेसह वाचन चळवळीला बळ मिळाले. योजनेच्या निमित्ताने काढण्यात आलेल्या लकी ड्रॉमध्ये विजेत्या ठरलेल्या चार महिलांना प्रत्येकी 25 हजार रुपयांच्या रोख बक्षिसासाठी निवड झाली.
दै. ‘पुढारी’ने ‘वाच बाई वाच’ ही योजना सुरू करून बचत गटांच्या उपक्रमाला व्यासपीठ उपलब्ध करून दिले. शिवाय, सहभागी सर्व महिलांना बक्षिसे देऊन वाचनाची आवड निर्माण केली. यानिमित्ताने गावागावांतील महिला एकत्रित आल्या. या अशा अनोख्या व नावीन्यपूर्ण उपक्रमामुळे महिलांमध्ये स्वयंनिर्भरता, उद्योग-व्यवसायाला चालना देण्यासाठी पाठबळ दिल्याबद्दल दै. ‘पुढारी’वर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला.
जिल्हा व्यवस्थापिका (मार्केटिंग) सुप्रिया पाटील म्हणाल्या, दै. ‘पुढारी’ची ही योजना महिलांना उमेद देणारी आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना विविध बचत गटांनी केलेल्या उपक्रमाची माहिती मिळाली. या माध्यमातून बचत गटांचे कार्य आणि चळवळ जनसामान्यांपर्यंत पोहोचली आहे. करवीर तालुका व्यवस्थापिका आरती पाटील म्हणाल्या, ही योजना महिलांना नवीन दिशा देणारी ठरली आहे. ‘वाच बाई वाच’ या योजनेतील यशोगाथा महिलांसाठी मार्गदर्शन ठरली आहे. तसेच बचत गटांनी राबविलेले उपक्रम जनतेसमोर आणण्याचे काम दै. ‘पुढारी’ने केले आहे.
दै. ‘पुढारी’चे कार्यकारी संपादक विजय जाधव म्हणाले, सध्याच्या मोबाईलच्या युगात या योजनेच्या माध्यमातून महिलांनी दै.‘पुढारी’ वृत्तपत्र घरी सुरू करून वाचन संस्कृतीला बळ देण्याचे काम केले आहे. भविष्यात दै. ‘पुढारी’च्या माध्यमातून महिलांसाठी अशा प्रेरणादायी योजना राबविण्यात येतील. ‘वाच बाई वाच’ योजनेच्या माध्यमातून करवीर तालुक्यातील वाड्यावस्तीवर दै. ‘पुढारी’चा अंक पोहोचवून जनजागृतीचे काम झाल्याचे समाधान व्यक्त केले.
प्रास्ताविकामध्ये बोलताना दै. ‘पुढारी’चे सरव्यवस्थापक डॉ. सुनील लोंढे म्हणाले, या योजनेच्या निमित्ताने बचत गटातील महिलांना दै. ‘पुढारी’च्या माध्यमातून जगभरातील घडामोडी व जिल्ह्यात उल्लेखनीय काम केलेल्या बचत गटांची माहिती मिळाल्यामुळे महिलांना प्रेरणा मिळाली. यावेळी वर्षा संभाजी पाटील (कावणे, ता. करवीर), योजना पाटील (भुयेवाडी) यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन दै. ‘पुढारी’चे वितरण व्यवस्थापक अमर पाटील यांनी केले. आभार वितरण व्यवस्थापक शिवाजी पाटील यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वितरण व्यवस्थापक उत्तम पालेकर, सहायक वितरण व्यवस्थापक उमेश सूर्यवंशी, महादेव कुरणे, किशोर मोरे, मिलिंद कुंभार, रोहित निगडे, शुभम कोठावळे यांनी परिश्रम घेतले.
‘वाच बाई वाच’ या योजनेसाठी वृत्तपत्र विक्रेत्यांचेही योगदान मोलाचे ठरले आहे. मात्र, जिथे वृत्तपत्र विक्रेते पोहोचणे शक्य नाही, अशा दुर्गम वाड्यावस्त्यांवर घरोघरी जाऊन गावातील सीआरपींनी वृत्तपत्रांचे वाटप केले आहे. डोंगरातील वाटा तुडवत, प्रसंगी पदरमोड करून, पायपीट करून सीआरपींनी ही योजना महिलांपर्यंत पोहोचवली. ज्या ग्रामीण महिला वृत्तपत्र खरेदी करू शकत नाहीत, त्यांना गावातील मंदिरात एकत्र करून सामूहिक वृत्तपत्र वाचनाचा उपक्रमही फलदायी ठरला आहे. दैनिक ‘पुढारी’मध्ये प्रसिद्ध झालेली ‘बचत गटांची यशोगाथा’ ही लेखमालिका या उपक्रमात वाचून दाखवल्याने महिलांनाही स्वयंनिर्भर होण्याचे बळ मिळाले आहे.
‘वाच बाई वाच’ या योजनेच्यानिमित्ताने काढण्यात आलेल्या लकी ड्रॉमधून या महिलांनी बक्षिसांचे मानकरी होण्यात बाजी मारली. यामध्ये सानिका अशितोष पाटील (भक्ती महिला बचत गट- कांचनवाडी, ता. करवीर), मुमताज दस्तगिर पेंंढारी (बचत गट- गुणाबाई समूह, भुये, ता. करवीर), वंदना तानाजी कांबळे (बचत गट- भीमाई समूह, आरे, ता. करवीर), उज्ज्वला विजय सुतार (बचत गट - आशीर्वाद महिला समूह वळीवडे, ता. करवीर) यांचा समावेश आहे. बक्षिसासाठी निवड होताच महिलांनी जल्लोष करत आनंदोत्सव साजरा केला.
‘वाच बाई वाच’ ही योजना करवीर तालुक्यातील शेवटच्या टोकाला राहणार्या महिलेपर्यंत पोहोचवण्यासाठी सीआरपींची साथ खूपच मोलाची ठरली. खचाखच भरलेले सभागृह सीआरपींच्या सन्मानासाठी टाळ्यांच्या गजराने दुमदुमले. त्यामुळे जेव्हा या कार्यक्रमात सीआरपींचा सन्मान करण्यात आला तेव्हा, ‘आम्ही बाई या योजनेच्या शिलेदार’ अशी अभिमानाची भावना त्यांच्या चेहर्यावर उमटली.