कोल्हापूर : आ. सदाभाऊ यांनी पाऊण तासाच्या मनोगतात महाराष्ट्राच्या राजकारणाचा सात-बाराच काढला. निमित्त होते ‘पुढारी न्यूज’च्या वतीने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ संचलित महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी जाणकार व धोरणकर्त्यांच्या महाचर्चेचे. या महाचर्चेत आ. सदाभाऊ खोत यांनी आपली रोखठोक मते मांडली. ‘पुढारी न्यूज’चे एडिटर प्रसन्न जोशी यांनी त्यांची मुलाखत घेतली.
आमची सारी जडणघडण प्रस्थापित विरुद्ध विस्थानित अशा परिस्थितीत झाली. वाडा विरुद्ध गावगाडा अशी लढाई लढत झाली. वायरच्या पिशवीत आणि बापाच्या धोतराच्या तुकड्यात भाकर आणि डाळकांदा घेऊन आम्ही लढाई लढलो. या लढाईत दैनिक ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधवसाहेबांची खूप मदत झाली. आमच्यासारख्या मातीतल्या माणसांना त्यांनी घडवले. त्यांच्यामुळे आम्ही जगाला दिसलो, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
मला महायुतीचे संकटमोचक, तारणहार म्हणतात; पण आम्ही त्या पंगतीत येत नाही. आम्ही जे काय केले ते दारिद्य्रात खितपत पडलेल्या गावगाड्यातल्या गुरासारखे राबणार्या माणसांसाठी केले. देशाला स्वातंत्र्य मिळाले; पण या माणसांना नाही. मग शरद जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही दुसरे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी कामाला लागलो. सत्ता बदलते म्हणजे काय होते? आपल्या छातीवरच्या मोठ्या चोराला काढून तिथे छोट्या चोराला बसवायचे. बाकी काय? काँग्रेसने अनेक वर्षे राज्य केले. ते भाषणात 20 कलमी कार्यक्रम, गरिबी हटाव असे काही तरी सांगायचे आणि गरिबांना वाटायचे आता गरिबी कायमची गेलीच; पण पोरगं रडायचे थांबलं की, आई खुळखुळा टाकून देते तसे हे सारे होते. आमच्या वाट्याला खुळखुळा आला आणि यांनी सारं खळं लुटलं, अशी टीका त्यांनी केली.
शेतकर्याला आपण केंद्रबिंदू मानतो का, असा सवाल त्यांनी केला. 75 टक्के समाज शेतीवर अवलंबून होता; पण आज तो 40 टक्क्यांवर आला आहे. शेतकरी, शेतकर्यांची पोरं शेतीतून शहराच्या दिशेने पलायन करायला लागली आहेत. समाजाचे सूत्र आता ‘कनिष्ठ शेती आणि वरिष्ठ व्यापार’ असे झाले आहे आणि म्हणूनच आरक्षणासाठी सार्यांची धावाधाव चालू आहे. शेती वरिष्ठ झाली, तर कशाला लागेल आरक्षण? सारे चित्रच वेगळे दिसले असते; पण शेतीला दुय्यम स्थान दिले गेले. शेतीवर अनेक बंधने घातली. शेतकरी म्हणजे अडाणी, धोतरवाला, शेतकर्याची बायको म्हणजे फाटका पदर आणि डोक्यावर पाटी असे वर्णन स्टेटसवाल्यांनी केले. जॅकेट घालून हाय-बाय, एस-नो म्हणतात त्यांना ही शेतकरी माणसं गावंढळ वाटतात, असा संताप त्यांनी व्यक्त केला. इंडिया आणि भारत यात फरक आहे तो हाच; पण इंडियातील माणसांना हे समजत नाही की, आपल्या ताटात दोन वेळचे जेवण येते ते याच गावंढळ माणसांमुळे येते. तो कष्ट करतो म्हणून आपण उभे आहोत. ही मानसिकताच आता संपली आहे. एका दाण्याचे हजार दाणे करायची ताकद शेतकर्यांत आहे. त्याला सबसिडी नको तर मार्केट द्या. बाप पिकवायला शिकला पण विकायला शिकला नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
कोण शिवभोजन काढतो, कोण साखर फुकटात देतो; पण कुणी बूट, चांदी-सोनं फुकटात दिलेले बघितलेय का? पेट्रोल फुकटात देतो, असे कुणी म्हणत नाही. सोने फुकटात वाटले, तर सोनाराचे दिवाळ निघेल की; पण शेतकर्याच्या मालाचं काय? कुठलं पण सरकार आले तरी शेतकर्याचेच फुकट वाटूया म्हणते. असे कसे चालेल? जर तुम्हाला सार्यांना स्वाभिमानाने उभे करायचे असेल, तर शेतीला उद्योगाचा दर्जा द्यावा लागेल, असे त्यांनी ठणकावून सांगितले. सोयाबीनचे दर आयात कर वाढवल्यामुळे वाढतात, असेही त्यांनी सांगितले. देवेंद्र फडणवीस यांनी जलयुक्त शिवाय योजना आणली. तीचे महत्त्व खेड्यात गेल्याशिवाय समजणार नाही. दोन-चार किलोमीटर चालत जाऊन प्यायला पाणी आणावे लागते. देवेंद्रनी जलयुक्त योजनेमुळे गावोगावी पाण्याची भांडीच तयार केली, असे त्यांनी आवर्जून सांगितले. फडणवीस यांनी शेतकर्यांच्या कंपन्या काढल्या. स्वत:चा माल स्वत:च विकायचे ठरवण्याचे अधिकार त्यांनी दिले, असेही त्यांनी सांगितले.
आमदार खोत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल खूप वेगळी भावना व्यक्त केली. देवेंद्र सार्यांचे मनापासून ऐकून घेतात. त्यांनी शेतकर्यांसाठी वीज बिल माफ, थकबाकी माफीसारखे अनेक चांगले निर्णय घेतले. नैसर्गिक आपत्तीत शेतकर्यांना मदत मिळावी म्हणून निकष बदलले. कांदा, दुधाचे प्रश्न संपवले. एक्स्प्रेस रेल्वेला शेतीमालासाठी वेगळा डबा जोडला. शेतीमध्ये खुले धोरण घेतले. केंद्रातून खूप निधी आणून पाण्याच्या योजना सुरू केल्या. त्यामुळेच दुष्काळी भाग हिरवागार झाल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. दुर्दैवाने ते सत्तेवर आले आणि मोर्चेच मोर्चे सुरू झाले. ते खूप काळजी करायचे. मला बोलवायचे. काय करुया म्हणायचे. मी म्हणायचो, आक्रमक बिक्रमक असे काही नसते. तुम्ही काळजी करू नका. दुधाच्या आंदोलनात मीच त्यांना मार्ग काढून दिला, असेही त्यांनी मनमोकळेपणाने सांगितले. गावाकडे फायद्याचे काही यायला लागले की, लगेच बजेट कोलमडायला कसे लागते. ते काय गांजा ओढते काय, असा सवाल करून लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये मिळाले, तर पोटात का दुखते, असे त्यांनी विचारले. तुम्हाला सातवा, आठवा वेतन आयोग मिळतो, आमचा तर हा पहिलाच वेतन आयोग आहे, तर लगेच ओरडता कशाला? आम्ही पण खरेदी करतो तेव्हा कर भरतच असतो की. की आम्ही चिंचोके भरतो, असा सवाल त्यांनी केला.
नेत्यांनी शेतकर्यांच्या पोरांचा घात केला. जाणता राजा आणि त्यांचे सरदार यात पुढे होते. गावगाडा सक्षम झाला, तर यांच्या दरबारात कोण उभा राहणार, अशी काळजी त्यांना वाटते. आम्ही ज्या तालुक्यात जन्मलो त्या तालुक्यात मोठे लॉबिंग असते. आम्हाला कोण मंत्री करणार? बाळासाहेब ठाकरे यांनी गरिबांची मुलं मंत्री केली. आम्ही पण राजकारणात सतरंज्या उचलल्या; पण ज्यांना जेवायला घरी नेले त्यांनी भांडी पण चोरली, असा टोला त्यांनी मारला. प्रत्येक क्षेत्रात एकेक सम्राट झालेत. ही सारी केव्हा जागी करायची त्याचा एक प्लॅन असतो. बरोबर बटन दाबले की, सारी जागी होतात. ओबीसी, एसटी, एससी, मराठा ही सारी अचानक एकदमच उठली आहेत आणि शेतीच्या प्रश्नावर कसलीच चर्चा होत नाही. कोणाला काहीही मिळणार नाही. राजकारणात अभ्यासू असे काही नसते. दहा रुपये जमा झाले की, ते खर्चायचे कसे हे समजले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
राजू शेट्टी यांना दैनिक ‘पुढारी’ने न्याय दिला. ‘पुढारी’तील बातम्या वाचून आम्ही धुरळा उठवायचो. आमच्या संघटेनत फूट पडायला नको होती. मी आजही संघटनेचा बिल्ला काढला नाही. राजू शेट्टी मला खूप वाईट वाटले; पण राजकारण आणि चळवळ एकत्र घुसळणे त्यांना महागात पडले. भविष्यात एकसंध चळवळ व्हावी, अशी माझी इच्छा असल्याची भावना आ. खोत यांनी व्यक्त केली.
राज्यमंत्र्याला साधी हाफ चड्डी पण नसते. नुसताच लंगोट. कसले अधिकार नसतात; पण तरीही शेतकर्यांची पोरं मार्केटमध्ये आली पाहिजेत, अशी भूमिका आपण घेतली आणि लढलो, असे आ. खोत यांनी सांगितले.
शेतीमालाचे दर वाढले तर बिघडले कुठे? जरा कुठे दर वाढले की, झाली लगेच बोंबाबोंब सुरू. गोडेतेल 200 रुपयाला म्हणजे काय महाग आहे का? दारूच्या बाटली इतका तरी दर तेलाला आहे का? बरं, महागाईविरुद्ध बडबडते कोण, तर ज्याला दीड-दोन लाख पगार आहेत ते. ढुंगणाला माती लागल्यावर कळेल की काय महाग आहे आणि काय नाही. महागाईच्या नावाने जे मोर्चे काढतात ते सारे आईतखाऊ असतात, असा सणसणीत टोला त्यांनी मारला.
एकनाथ शिंदे शांत दिसायचे; पण मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी नुसता धुरळाच उठवला. पॉवर आली की, माणूस ताजातवाना होतो. माझं मंत्रिपद गेल्यावर मला एकाचाही फोन आला नाही, असेही त्यांनी हसत-हसत सांगितले.
आता निवडणुकीचा हंगाम आला आहे. सगळ्यांनाच पंढरीला जायचे आहे. प्रत्येकाची वेगळी दिंडी आहे. शरद पवारांनी दुसर्या पक्षातला माणूस घेतला; तर युतीला धक्का आणि देवेंद्र यांनी घेतला, तर ते लगेच पक्ष फोडत आहेत, असे म्हणायचे. हे योग्य नाही.