पुढारी ऑनलाईन डेस्क : काेल्हापूरमधील संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या आगीची घटना दुर्दैवी आहे, संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह पुन्हा जसेच्या तसे उभे करण्यासाठी राज्य शासनाने २५ कोटी रुपये निधी मंजूर केला. हे नाट्यगृह पुन्हा जसेच्या तसे उभारले जाईल, अशी माहिती राज्य नियोजन मंडळाचे (मंत्रीपद दर्जा) कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी 'पुढारी NEWS विकास SUMMIT 2024'मध्ये बोलताना दिली.
कोल्हापूर, सांगलीत पुराचा प्रश्न आहे. त्यासाठी आम्ही ३,२०० कोटींचा पूर नियंत्रण प्रकल्प आणतोय. ३ महिन्यांत निविदा होईल. एक वर्ष- दीड वर्षात काम होईल. यामुळे पुढील दोन वर्षांत पूर आला तर कोल्हापूर आणि सांगलीला नुकसानीला सामोरे जावे लागणार नाही, असा विश्वासही राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केला.
कोल्हापूर महानगरपालिकेत रोजदारींवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना २८ वर्षे न्याय मिळत नव्हता. पण आम्ही या ५०७ कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून दिला. कोल्हापूरसाठी ८५ कोटी निधी आणला. खूप चांगले काम कोल्हापूरसह राज्यात सुरु असल्याचे राजेश क्षीरसागर यांनी सांगितले. हद्दवाढीचाही सातत्याने पाठपुरावा करत असल्याचे त्यांनी नमूद केले.
गेल्या अडीच वर्षात महायुती सरकारने चांगले काम केले. विशेषतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जनतेसाठी दिवस-रात्र काम करत आहेत. त्यांनी देशाला दाखवून दिले की मुख्यमंत्री कसा असावा? राज्याला एक सक्षम मुख्यमंत्री मिळाला आहे. मी शिंदे यांच्यासारखा मुख्यमंत्री पाहिला नाही, अशी भावना क्षीरसागर यांनी व्यक्त केली.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना प्रभावी ठरली आहे. राज्यातील २ कोटी महिलांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. या योजनेचा लाभ घेण्यात कोल्हापूर जिल्हा राज्यात दुसरा क्रमांकावर आहे. महिलांना सक्षम करणारी ही योजना आहे. सरकारने मुलींसाठी मोफत उच्च शिक्षण देणारी योजना आणली आहे. ज्यांचे उत्पन्न ८ लाखांपेक्षा आहे; त्यांना या योजनेचा लाभ घेता येते.