कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : एमआयडीसी प्रस्तुत 'पुढारी न्यूज' विकास समीटमध्ये उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यासह राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री तानाजी सांवत, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष, 'मित्रा' संस्थेचे उपाध्यक्ष राजेश क्षीरसागर, आमदार डॉ. विनय कोरे, आमदार सदाभाऊ खोत, कोल्हापूर महापालिकेच्या आयुक्त के. मंजूलक्ष्मी, आयुष्यमान भारत योजनेचे राज्याचे प्रमुख डॉ. ओमप्रकाश शेटे, एमसीसीआयचे निवृत्त महासंचालक अनंत सरदेशमुख सहभागी झाले होते. या समीटमध्ये उद्योग, आरोग्य, महिला आणि कृषी या विषयांवर मान्यवरांच्या विचारांचे मंथन झाले.
राज्याच्या विकासासाठी डबल इंजिन सरकारच हवे, यामुळे डबल इंजिन सरकारला साथ द्या, असे आवाहन उद्योग मंत्री सामंत, वैद्यकीय शिक्षण मंत्री मुश्रीफ, आरोग्य मंत्री सावंत आणि 'मित्रा'चे उपाध्यक्ष क्षीरसागर यांनी केले. 'पुढारी' माध्यम समुहाचे चेअरमन, दैनिक 'पुढारी'चे समुह संपादक डॉ. योगेश जाधव यांच्याहस्ते मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. सुमारे चार तास चाललेल्या या कार्यक्रमात राज्याच्या सर्वांगिण विकासावर चर्चा झाली. या कार्यक्रमाला उद्योग, व्यापार, सामाजिक, सांस्कृतिक, आरोग्य, कृषी आदी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
उद्योगांना वेगवेगळ्या सुविधा दिल्या जात असल्याने महाराष्ट्रात गुंतवणुकीचा ओढा वाढला आहे. उद्योगांच्या विस्तारामधूनच ९६ हजार कोटी रूपयांची गुंतवणूक हेाणार आहे. महाराष्ट्रातील एकही प्रकल्प गुजरातला गेला नाही त्यामुळे कोणी कितीही टीका केली तरी टीकाकारांना उद्योग आणून उत्तर दिल्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.