Pudhari Natyotsav | विनोदातून नात्यांचा आरसा दाखवत उलगडले ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’

टाळ्यांच्या गजरात रसिकांची दाद; हाऊसफुल्ल गर्दीत ‘पुढारी नाट्योत्सव’चा समारोप
कोल्हापूर : ‘पुढारी नाट्योत्सव’अंतर्गत सादर झालेल्या ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ नाटकातील कलाकारांसोबत सर्व मान्यवर प्रायोजक.
कोल्हापूर : ‘पुढारी नाट्योत्सव’अंतर्गत सादर झालेल्या ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ नाटकातील कलाकारांसोबत सर्व मान्यवर प्रायोजक.
Published on
Updated on

कोल्हापूर : वैवाहिक जीवनाचा प्रवास, अपेक्षा, संवादाचा अभाव आणि त्यातून निर्माण होणाऱ्या गमतीदार प्रसंगांचा हलक्याफुलक्या शैलीतून उलगडत गेलेल्या ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ या नाटकाने रसिक प्रेक्षकांना हसवत नात्यांचा आरसा दाखवला. प्रशांत दामले, कविता मेढेकर-लाड, अद्वैत दादरकर यांच्यासह कसलेल्या कलाकारांच्या बावनकशी अभिनयाने रंगमंचावर बहार आणली.

नाटकाला झालेली प्रेक्षकांची हाऊसफुल्ल गर्दी.
नाटकाला झालेली प्रेक्षकांची हाऊसफुल्ल गर्दी.

गेल्या तीन दिवसांपासून सायबर कॉलेज कॅम्पस्‌मधील आनंद भवन येथे सुरू असलेल्या ‘पुढारी नाट्योत्सव’चा सोमवारी हाऊसफुल्ल गर्दीत समाराेप झाला. अद्वैत दादरकर लिखित, दिग्दर्शित या नाटकाने कोल्हापूरकर रसिकांचे दिलखुलास मनोरंजन केले. प्रसंगानुरूप विनोद, खुसखुशीत संवाद आणि कलाकारांच्या सहजसुंदर अभिनयामुळे संपूर्ण प्रयोग रंगतदार ठरला. तीन दिवसांच्या या नाट्योत्सवला प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला.

प्रशांत दामले आणि कविता मेढेकर-लाड यांनी प्रमुख भूमिकांमधून वैवाहिक आयुष्यातील गमती-जमती, गैरसमज आणि भावनिक पैलू प्रभावीपणे उभे केले. त्यांच्या अचूक विनोदी टायमिंगला प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. पूर्वा भिडे, राजसी चिटणीस व राजसिंह देशमुख यांनीही आपल्या भूमिका समर्थपणे साकारत कथानकात रंगत आणली. संवादांमधील मिश्कीलपणा, प्रसंगांची वेगवान मांडणी आणि कलाकारांचा सहज अभिनय यामुळे प्रेक्षकांना अखेरपर्यंत कथानकात गुंतून ठेवण्यात नाटकाने बाजी मारली. हसवतानाच नात्यातील समजूतदारपणा, विश्वास आणि संवादाचे महत्त्व अधोरेखित करणारे हे नाटक मनोरंजनासोबतच विचारांचीही हलकीशी पेरणी करून गेले. प्रयोगाच्या अखेरीस कलाकारांना उभे राहून टाळ्यांची दाद देण्यात आली.

प्रायोजकांच्या वतीने कलाकारांचा सत्कार

नाट्योत्सवाचे मुख्य प्रायोजक मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ सराफ व जव्हेरीच्या कोल्हापूरच्या व्यवस्थापक अश्विनी महाजन, सहयोगी प्रायोजक एलआयसी ऑफ इंडियाचे सिनिअर डिव्हीजनल मॅनेजर चंद्रप्रकाश पराते, एलआयसी ऑफ इंडियाचे मार्केटिंग मॅनेजर चंद्रशेखर आगरकर, येवलेज मिल्क कॉर्नरचे मालक विजय येवले, विद्या येवले, विशेष सहकार्य केलेले ड्रीम व्हिजन हॉस्पिटॅलिटी प्रा. लि.च्या अर्चना व्हरांबळे, सूर्यकांत अडसूळ यांच्या हस्ते सर्व कलाकारांचा सत्कार करण्यात आला. या नाट्यमहोत्सवास नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेसचेही विशेष सहकार्य मिळाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news