‘पुढारी’च्या ‘नाट्योत्सवात’ खुसखुशीत नाटकांची मेजवानी

रंगभूमीवर गाजलेल्या ‘नियम व अटी लागू’ आणि ‘आमने-सामने’ नाटकांचे खास प्रयोग
pudhari-natyotsav-comedy-plays-feast
‘पुढारी’च्या ‘नाट्योत्सवात’ खुसखुशीत नाटकांची मेजवानीPudhari File Photo
Published on
Updated on

कोल्हापूर : रसिक नाट्यप्रेमींसाठी एक खास सांस्कृतिक मेजवानी ‘पुढारी नाट्योत्सव’ घेऊन येत आहे. दसरा, दिवाळीच्या मंगलमय वातावरणात, सध्याच्या काळातील नातेसंबंध, पिढ्यांमधील अंतर आणि बदलत्या जीवनशैलीवर खुसखुशीत भाष्य करणार्‍या दोन गाजलेल्या नाटकांचे प्रयोग ‘नाट्योत्सवा’च्या माध्यमातून रसिकांच्या भेटीला येत आहेत.

मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ सराफ हे नाट्योत्सवाचे मुख्य प्रायोजक आहेत. या दोन दिवसीय नाट्योत्सवात, मराठी रंगभूमीवरील दोन लोकप्रिय आणि विचारप्रवर्तक कलाकृती आनंद भवन, सायबर कॉलेज कॅम्पस, कोल्हापूर येथे मंगळवारी (दि. 7) आणि बुधवारी (दि. 8) सादर होणार आहेत.

‘नियम व अटी लागू’ : आजच्या पिढीचं खुसखुशीत नाटक

चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित आणि संकर्षण कर्‍हाडे लिखित हे नाटक आजच्या तरुणाईच्या जीवनावर आधारित आहे. पती-पत्नीच्या नात्यातील बदलत्या अपेक्षा आणि त्यांना लागू केलेले ‘नियम व अटी’ पाळताना होणारी विनोदी कसरत यात पाहायला मिळते. संकर्षण कर्‍हाडे आणि अमृता देशमुख यांची भूमिका असलेले हे नाटक प्रेक्षकांना भरपूर हसवते आणि विचार करायलाही लावते.

‘आमने-सामने’ : हास्य आणि विचारांची जुगलबंदी

दिग्दर्शक नीरज शिरवईकर यांच्या दिग्दर्शनाखालील हे नाटक कुटुंबातील दोन पिढ्यांच्या विचारांतील अंतर आणि लग्नसंस्थेवर आधारित आहे. ज्येष्ठ अभिनेते मंगेश कदम आणि लीना भागवत यांच्या अभिनयाची जुगलबंदी या नाटकाचे मुख्य आकर्षण आहे. पिढीनुसार बदलणार्‍या नात्यांचे आयाम अत्यंत रंजक पद्धतीने यात मांडले आहेत.

कोल्हापुरातील सर्व नाट्यप्रेमी आणि रसिकांनी आपल्या कुटुंबीय व मित्रपरिवारासोबत मराठी रंगभूमीच्या या लोकप्रिय कलाकृतींचा आनंद घेण्यासाठी नाट्यगृहात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news