

कोल्हापूर : कोल्हापूरकरांच्या नववर्ष स्वागताचा उत्साह वाढवण्यासाठी आणि ख्रिसमसच्या सुट्ट्यांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी ‘पुढारी कोल्हापूर कार्निव्हल 2025’ गुरुवार, दि. 25 पासून मोठ्या थाटात सुरू होणार आहे. नागाळा पार्क येथील मेरी वेदर ग्राऊंडवर आयोजित या भव्य महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.
हा भव्य महोत्सव ‘माणिकचंद ऑक्सिरिच’ पॉवर्ड बाय असून, ‘वारणा आईस्क्रीम’ असोसिएट स्पॉन्सर आणि ‘लकी फर्निचर’ हे या उपक्रमाचे अधिकृत फर्निचर पार्टनर आहेत. खरेदीचा महाकुंभ, खाद्यपदार्थांची मेजवानी आणि मनोरंजनाचा त्रिवेणी संगम असलेल्या या कार्निव्हलचे काऊंटडाऊन आता संपले असून, संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
ऑक्सिरिचचे सागर ललवाणी , वारणा दूध संघाचे कार्यकारी संचालक सुधीर कामेरीकर, मार्केटिंग मॅनेजर अनिल हेर्ले, रॉनिक स्मार्टचे तानाजी पवार, लकी फर्निचरच्या संचालिका अनुपमा बडे, सोसायटी टीचे असिस्टंट ब्रँड मॅनेजर क्षितिज तांडेल यावेळी उपस्थित राहणार आहेत.
एकाच छताखाली 130 हून अधिक स्टॉल्स
या कार्निव्हलमध्ये 130 पेक्षा जास्त स्टॉल्स असून, कारपासून कार्पेटपर्यंत सर्व काही एकाच ठिकाणी उपलब्ध असेल. विशेषतः ऑटोमोबाईल दालनात चारचाकी आणि ई-वाहनांच्या खरेदीवर विशेष ऑफर्स आणि स्पॉट बुकिंगवर भरघोस सूट मिळणार आहे. तसेच घरगुती वापराच्या वस्तू, इलेक्ट्रॉनिक्स, होम डेकोर आणि ज्वेलरीची मोठी श्रेणी येथे पाहायला मिळेल.
खवय्यांची चंगळ आणि मनोरंजनाची पर्वणी
महोत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे कोल्हापुरी तांबडा-पांढरा रस्सा आणि अस्सल चवीचे शाकाहारी पदार्थ यासोबतच दररोज सायंकाळी लाईव्ह ऑर्केस्ट्रा, कराओके आणि डीजे नाईटमुळे मेरी वेदर ग्राऊंडवर उत्साहाचे उधाण येणार आहे. लहान मुलांसाठी अॅम्युझमेंट पार्क आणि रात्रीची नेत्रदीपक रोषणाई हे आकर्षणाचे केंद्रबिंदू असतील.
या महोत्सवाच्या भव्य मंडप उभारणीचे काम पूर्ण झाले असून, गुरुवार, दि. 25 ते 29 डिसेंबर या कालावधीत सकाळी 11 ते रात्री 9 पर्यंत हे प्रदर्शन सर्व ग्राहकांसाठी खुले राहणार आहे. अधिक माहितीसाठी संपर्क : 9545327545.
‘पुढारी’ शॉपिंग उत्सव बंपर ड्रॉ आज
या सोहळ्याचे आणखी एक आकर्षण म्हणजे दै. ‘पुढारी’ दसरा-दिवाळी शॉपिंग उत्सव 2025 चा बंपर ड्रॉ. या उत्सवांतर्गत सहभागी दुकानांतून खरेदी केलेल्या ग्राहकांना लकी कूपन्स देण्यात आली होती. या सर्व कूपन्समधून शहरी विभागासाठी दोन साप्ताहिक ड्रॉ आणि 1 ग्रामीण विभागाचा ड्रॉ काढण्यात आला आहे. या योजनेचा बंपर ड्रॉ पालकमंत्री प्रकाश आबिटकर व मान्यवरांच्या हस्ते काढला जाणार आहे.