

कोल्हापूर : दैनंदिन धावपळ, घर-नोकरी-व्यवसायाच्या जबाबदार्यांचा ताण आणि स्वतःसाठी वेळ न मिळणार्या महिलांना आयुष्यातून काही क्षण मोकळेपणाने जगता यावेत, या उद्देशाने दैनिक ‘पुढारी’ कस्तुरी क्लब व अ हेवन हॉलिडेज यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली थायलंड महिला स्पेशल सहल अक्षरशः ‘आनंदवारी’ ठरली. तब्बल 450 महिलांनी या सहलीत सहभाग घेत पाच दिवस थायलंडमधील विविध पर्यटनस्थळांचा मनमुराद आनंद घेतला. नुकतेच या महिलांचे मायदेशी आगमन झाले असून पर्यटनासोबत मनोरंजनाची लयलूट अविस्मरणीय असल्याची भावना महिलांनी व्यक्त केली. सहल आयोजित झाल्यानंतर निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीतही अडथळ्यांवर मात करत सहल यशस्वी केली. असे अ हेवन हॉलिडेजचे राजेंद्र बुगडे यांनी सांगितले.
कोल्हापूर, गडहिंग्लज, कागल, सांगली, इचलकरंजी, ईश्वरपूर, सातारा, कराड आणि पुणे येथून सहभागी झालेल्या महिलांची थायलंड सहल 20 एप्रिलच्या रात्री सुरू झाली. पुणे आणि मुंबई विमानतळावरून महिला थायलंडच्या दिशेने झेपावल्या. घरातील जबाबदार्या, कामाचा ताण, कुटुंबाची काळजी या सगळ्यात स्वतःची आवड-निवड मागे पडते; पण या सहलीत महिलांनी कोणतीही बंधने न ठेवता मनमुराद आनंद घेतला.
21 एप्रिलला सकाळी पटाया येथे पोहोचल्यानंतर सहलीला सुरुवात झाली. स्पीड बोटिंग, पॅरासेलिंग, बनाना राईडसारख्या थरारक अनुभवांनी अनेक महिलांनी भीतीवर मात करत आत्मविश्वास वाढवला. काहींसाठी हा आयुष्यातील पहिलाच परदेश प्रवास होता, तर काही जणींसाठी पहिल्यांदाच स्वतःसाठी घेतलेला ‘ब्रेक’. ही सहल केवळ पर्यटनापुरती मर्यादित न राहता महिलांसाठी स्वतःला नव्याने शोधण्याचा अनोखा प्रवास ठरली.
नुंगनूच व्हिलेजमध्ये 850 एकरमधील विस्तीर्ण ट्रॉपिकल गार्डनमधील नैसर्गिक सौंदर्य, थाई संस्कृतीचे दर्शन, तसेच स्थानिक खाद्य संस्कृतीचा अनुभव घेताना महिलांनी वेगळ्या जगाची ओळख करून घेतली. बँकॉकमधील एलिफंट शो, कल्चरल शो, स्टंट शो सफारी वर्ल्ड, मरीन थीम पार्क यासारख्या पर्यटनाने महिलांच्या आनंदात अधिकच भर पडली. क्रूझ डेट हा थायलंडवारीतील अत्युच्य क्षण ठरला. गोल्डन व मार्बल बुद्ध मंदिरातील दर्शनाने महिला सुखावल्या. असंख्य फोटो काढून महिलांनी सहलीतील क्षण कैद केले.
महिलांसाठी ही सहल म्हणजे केवळ परदेशवारी नव्हे, तर स्वतःला वेळ देण्याची, मैत्री जपण्याची आणि आयुष्याकडे नव्या द़ृष्टीने पाहण्याची संधी ठरली. आम्हीही आनंद घेऊ शकतो, स्वतःसाठी जगू शकतो, हा आत्मविश्वास या सहलीतून प्रत्येक महिलेला मिळाला. कस्तुरी क्लबच्या या उपक्रमामुळे महिलांचा आनंद आणि समाधान, हीच या सहलीची खरी यशोगाथा ठरली.
स्वत:साठी वेळ काढा : डॉ. स्मितादेवी जाधव
या सहलीची मुख्य आकर्षण ठरली ‘कस्तुरी नाईट’ 24 एप्रिल रोजी आयोजित या कार्यक्रमात महिलांनी फॅशन शो, खेळ, नृत्य आणि विविध उपक्रमांमधून आपल्या कलागुणांना वाव दिला. दैनिक ‘पुढारी’ कस्तुरी क्लबच्या अध्यक्षा डॉ. स्मितादेवी जाधव यांच्या खास उपस्थितीत रंगलेल्या या कार्यक्रमाने सहलीचा उत्साह शिगेला पोहोचवला. यावेळी महिलांशी संवाद साधताना डॉ. स्मितादेवी जाधव म्हणाल्या, महिला कुटुंबासाठी नेहमीच आपल्या छंदांना मुरड घालत असतात; मात्र आता महिलांनीही स्वत:साठी वेळ काढला पाहिजे. स्वत:वर प्रेम करता आले पाहिजे. याच हेतूने कस्तुरी क्लबची स्थापना केली आहे. दहा शहरांमधून महिलांचा सहभाग असून, यामुळे कस्तुरी क्लबचा नवा इतिहास घडला याचा आनंद आहे.
स्वप्नांना पंख देणारी अ हेवन हॉलिडेज
विविध सहलींचे आयोजन करून स्वप्नांना पंख देणारी संस्था अशी ‘अ हेवन हॉलिडेज’ची ओळख बनली आहे. संस्थापक राजेंद्र बुगडे यांनी संघर्षातून उभारलेल्या या कंपनीतर्फे सर्वसामान्य, मध्यमवर्गीय कुटुंबांतील पर्यटकांसाठी बजेट टूर आयोजित केली जाते. वैयक्तिक लक्ष, सुरक्षिततेची हमी, विश्वासार्ह सेवा यातून अ हेवन हॉलिडेज कंपनीने पर्यटकांच्या मनात स्थान मिळवले आहे.