

कोल्हापूर ः किल्ले रायगडावर अंधार सरत होता आणि पहाटेच्या शुभघडीला सहस्र दीप उजळले होते. पवित्र मंत्रोच्चारांचा घोष घुमत होता. ढोल-ताशांचे चैतन्यमय निनाद आसमंत भेदत होते. सारा रायगडच काय, अख्खा सह्याद्री या ऐतिहासिक क्षणासाठी सज्ज होता. आज महाराष्ट्राचा युगनिर्माता सिंहासनाधिश्वर होणार होता. अभिषेकशालेत साक्षात महाराज उभे होते. तेजस्वी, शांत आणि भविष्यात रोखलेली द़ृढ नजर... त्यांच्याभोवती अष्टप्रधान मंडळ. प्रत्येकाच्या हाती पवित्र कलश. प्रत्येक कलशातील शुभ घटकांचा महाराजांवर होणारा अभिषेक. जलधारांच्या त्या पावन सरींमध्ये संपूर्ण महाराष्ट्राचं स्वराज्याचं स्वप्न मूर्त स्वरूप धारण करत होतं.
हीच अनुभूती, हा सोहळा पुन्हा एकदा आपल्या समोर जिवंत होणार आहे ‘गोष्ट इथेच संपत नाही’च्या सादरीकरणातून. याच भावविश्वाचा भाग होण्यासाठी 6 जूनच्या शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून, दै. ‘पुढारी’तर्फे कोल्हापूर आणि सांगलीत ‘गोष्ट इथेच संपत नाही’ या विशेष इतिहासप्रधान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ सराफ आणि जव्हेरी सांगली हे या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक आहेत.
आयटी क्षेत्रात कार्यरत असलेले दोन अभ्यासू आणि प्रयोगशील युवक सारंग मांडके आणि सारंग भोईरकर हे सादरीकरण करणार आहेत. इतिहासाची आवड आणि सखोल अभ्यास यांच्या जोरावर त्यांनी गेल्या पाच वर्षांत ‘गोष्ट इथेच संपत नाही’चे 100 हून अधिक प्रयोग केले आहेत. शिवचरित्रातील विशिष्ट ऐतिहासिक घटना उचलतात आणि त्या प्रसंगाभोवती काळ, नकाशे, रणनीती, प्रमुख व्यक्तिरेखा आणि ऐतिहासिक स्थळे यांच्या सहाय्याने एक रोमांचक, प्रभावी आणि दृश्य-श्राव्य अनुभव तयार श्रोत्यांसमोर उभे करतात. यावेळी ते ‘शिवराज्याभिषेक’ या अत्यंत महत्त्वपूर्ण आणि हृदयस्पर्शी सोहळ्याचे चित्रण सादर करणार आहेत. त्यांची सादरीकरण शैली, अभ्यासपूर्ण सादरीकरण आणि तपशिलातील बारकावे इतिहासप्रेमींसाठी एक अविस्मरणीय क्षण ठरणार आहे.
कोल्हापूर : शनिवार, 7 जून 2025, सायंकाळी 4.30 वा. गोविंदराव टेंबे सभागृह (देवल क्लब)
सांगली : रविवार, 8 जून, सायंकाळी 4.30 वा. विष्णूदास भावे नाट्यगृह, हरभट रोड, सांगली.
तिकीट दर : 500, 400 व 300 रुपये