

कोल्हापूर : इतिहासाच्या छातीवर काही वज्रलेख कोरले गेलेले असतात जे संपूर्ण राष्ट्रासाठी अक्षय आणि चिरंतन प्रेरणेचे स्रोत असतात. असा एक अपूर्व मांगल्याचा क्षण नियतीने हिंदुस्थानच्या इतिहासात अमर करून ठेवला आणि तो क्षण होता: शालिवाहन शके 1596, आनंद नाम संवत्सर, ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी, हाच तो क्षण, शिवराय सिंहासनाधिश्वर छत्रपती झाले.
सारंग भोईरकर आणि सारंग मांडके सांगत होते. आपल्या ओघवत्या वाणीतून त्यांनी उपस्थितांपुढे शिवरायांचा राज्याभिषेकाचा दरबारच उभा केला. निमित्त होतं ‘गोष्ट इथे संपत नाही’ या दै. ‘पुढारी’ च्या विशेष कार्यक्रमाचं. या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक होते मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ सराफ आणि जव्हेरी. ‘कित्येक दुष्ट संहारिला, कित्येकांसी धाक सुटला कित्येकांस आश्रय जाहला, शिवकल्याण राजा’ अशा शब्दांत ज्यांचे वर्णन केले आहे, त्या छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक एक अभूतपूर्व घटना, एक असा प्रसंग, ज्याने जुलमी गुलामगिरीचे दोर तोडून एका लोककल्याणकारी राज्याची, हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. असे सांगत भोईरकर आणि मांडके यांनी रायगडाची भव्यता, अभेद्यता, शिवरायांच्या दूरद़ृष्टी, प्रजाहितदक्षता, हिरोजी इंदुलकरांची स्वामीनिष्ठा प्रत्यक्ष पुराव्यातून मांडून त्यांनी उपस्थितांपुढे जणू त्यानी शिवकाळच उभा केला. दरबाराच्या वर्णनातून अंगावर रोमांच उभे राहिले.
राज्याभिषेक केवळ एका भूभागावर वर्चस्व प्रस्थापित करण्याचा विधी नव्हता. ‘मराठा राजा आता ‘छत्रपती’ म्हणून सार्वभौम होतोय’, हे जगाला सांगणारा तो ऐतिहासिक क्षण होता. गागा भट्टांनी रचलेल्या ‘राज्याभिषेक ग्रंथ’ आणि त्या मागची वैदिक विधी परंपरेतील पुनर्स्थापना म्हणजे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक अस्मितेचा उदय. धार्मिक विधींचा अर्थ, त्याची संपूर्ण पार्श्वभूमी त्यातील बारकाव्यांसह उलगडून सांगितली. कार्यक्रमाच्या शेवटी प्रत्येकजण भारावला. टाळ्यांच्या कडकडाटात कार्यक्रमाचा समारोप झाला.