

कोल्हापूर : किल्ले रायगडावर अंधार हळूहळू सरू लागला होता. पहाटेचा काहीसा शांत क्षण; पण रोमारोमांतून अगणित भावना जागवत होता. सहस्र दिव्यांनी रायगड उजळून निघाला होता. जणू स्वराज्याचं स्वप्न साकारणारा नवा सूर्योदय होणार होता. मंत्रोच्चारांनी मंगल झालेल्या रायगडावरील वातावरणात एक नवा उत्साह संचारला होता. संपूर्ण रायगडच नाही, तर संपूर्ण सह्याद्री या एका क्षणासाठी आतुर झाला होता, शिवराज्याभिषेकाचा हा अभिमान क्षण-शब्दचित्रांतून साकारणारा कार्यक्रम ‘गोष्ट इथे संपत नाही’ शनिवारी (दि. 7) कोल्हापुरात सादर होत आहे.
प्रत्येक मराठी माणसासाठी अभिमानाचा क्षण असलेल्या शिवरायांच्या राज्याभिषेकाच्या ऐतिहासिक दरबारातील भावविश्वाचा भाग होण्याची संधी दैनिक ‘पुढारी’ आयोजित या कार्यक्रमात कोल्हापूर आणि सांगलीतील शिवप्रेमींना मिळणार आहे. मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ सराफ आणि जव्हेरी सांगली हे या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक आहेत.
आयटी क्षेत्रातील दोन अभ्यासू आणि प्रयोगशील युवकांनी हे शिवधनुष्य उचलले आहे. सारंग मांडके आणि सारंग भोईरकर या दोघांनी इतिहासाची आवड आणि सखोल अभ्यास याच्या जोरावर ही द़ृश्ये जिवंत केली असून, त्यांनी या प्रयोगाचे 100 हून अधिक प्रयोग केले आहेत. शिवचरित्रातील विशिष्ट ऐतिहासिक घटना निवडून त्याभोवती काळ, नकाशे, रणनीती, प्रमुख व्यक्तिरेखा आणि ऐतिहासिक स्थळे यांच्या साहाय्याने एक रोमांचक, प्रभावी आणि द़ृक-श्राव्य अनुभव उभा करणे हे या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य आहे.
यावेळी त्यांनी ‘शिवराज्याभिषेक’ या सर्वोच्च अभिमानाच्या सोहळ्याची निवड केली आहे. त्यांची सादरीकरणशैली, सखोल अभ्यास आणि तपशिलातील बारकावे इतिहासप्रेमींसाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरणार आहेत.