

कोल्हापूर : दै. ‘पुढारी’ आणि डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘डॉक्टर्स डे व्याख्यानमाला’ आपल्या यशस्वी वाटचालीची २३ वर्षे पूर्ण करत आहे. आरोग्यविषयक प्रबोधनाचे एक प्रभावी व्यासपीठ ठरलेली ही व्याख्यानमाला आता एक ‘ब्रँड’ बनली आहे. यावर्षीच्या २३ व्या पुष्पाचे मानकरी म्हणून ख्यातनाम बालरोगतज्ज्ञ डॉ. हेमंत जोशी उपस्थित राहणार असून, ते ‘दीर्घ आरोग्याची गुरुकिल्ली’ या विषयावर कोल्हापूरकरांना आपल्या दीर्घ अनुभवाच्या आधारे मार्गदर्शन करणार आहेत.
येत्या बुधवारी, १ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता शाहू स्मारक भवन, दसरा चौक येथे हा कार्यक्रम होणार आहे. विशेष म्हणजे, नूतनीकरणानंतर शाहू जयंती पुरस्कार वितरण कार्यक्रमानंतर या सभागृहात होणारा हा पहिलाच कार्यक्रम असल्याने कोल्हापूरकरांमध्ये याबद्दल मोठी उत्सुकता आहे.
व्याख्यानमालेचा समृद्ध वारसा
गेल्या दोन दशकांहून अधिक काळ समाजातील आरोग्यविषयक प्रश्नांवर भाष्य करणारी ही व्याख्यानमाला आरोग्यसेवेसाठी ‘संजीवनी’ ठरली आहे. आतापर्यंत या उपक्रमात प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. प्रमोद जोग (पुणे), योगी डॉ. समप्रसाद विनोद, हृदयरोगतज्ज्ञ डॉ. जगदीश हिरेमठ, प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ डॉ. तात्याराव लहाने, अस्थिरोगतज्ज्ञ पद्मश्री डॉ. सलीम आवाजी, नंदकुमार लाड, मधुमेहतज्ज्ञ डॉ. बोरासकर, डॉ. आसगावकर, मनोविकारतज्ज्ञ डॉ. उल्हास लुकतुके, स्पाईनतज्ज्ञ डॉ. शेखर भोजराज, डॉ. सतीश गुप्ता, डॉ. मोहित गुप्ता, डॉ. अविनाश सुपे, डॉ. संजय ओक, डॉ. कल्याण गंगवाल, आहारतज्ज्ञ डॉ. रुजुता दिवेकर, अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. के. एच. संचेती, डॉ. मिलिंद मोडक, डॉ. रत्नपारखी, डॉ. प्रेमानंद रमाणी, डॉ. मनु कोठारी आणि डॉ. सुभाष रानडे या सारख्या दिग्गज डॉक्टरांची व्याख्याने झाली आहेत.
मोफत पुस्तकांच्या लिंक
डॉ. हेमंत आणि डॉ. अर्चना जोशी यांनी बाल संगोपन, लसीकरण, मधुमेह निवारण आणि ‘ईट राईट’सारख्या महत्त्वाच्या विषयांवर ११ भाषांतून माहितीपर पुस्तके व व्हिडीओ निर्मिती केली असून, हे साहित्य डिजिटल क्यूआर कोडद्वारे सर्वांना विनामूल्य उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
प्रवेश अग्रक्रमानुसार
कार्यक्रमाला प्रवेश अग्रक्रमानुसार देण्यात येणार असून, पहिल्या तीन रांगा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. कोल्हापूरमधील पालक, वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन व्याख्यानमालेचे समन्वयक डॉ. संदीप ज. पाटील यांनी केले आहे.
डॉ. हेमंत जोशी समाजहितासाठी समर्पित व्यक्तिमत्त्व
डॉ. हेमंत जोशी हे केवळ एक उत्तम बालरोगतज्ज्ञ नसून ते एक ‘सामाजिक बालरोगतज्ज्ञ’ म्हणून परिचित आहेत. विरार येथे कार्यरत असलेले डॉ. जोशी यांनी गेली ४० वर्षे वैद्यकीय क्षेत्रात निष्ठेने काम केले आहे. दोन लाखांहून अधिक बालकांच्या उपचारांचा अनुभव त्यांच्या पाठीशी असून, ‘१५० न्यू आयडियाज टू इम्प्रूव्ह ग्लोबल चाइल्ड सर्व्हायव्हल’ यांसारख्या जागतिक दर्जाच्या हँडबुक्सचे ते सहलेखक आहेत. वैद्यकीय औषधांच्या सूचना प्रादेशिक भाषेत असाव्यात, यासाठी त्यांनी पुकारलेला लढा समाजासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे. त्यांच्या मार्गदर्शनातून आरोग्याकडे बघण्याचा एक समग्र आणि वास्तववादी दृष्टिकोन कोल्हापूरकरांना मिळणार आहे, अशी माहिती समन्वयक डॉ. संदीप ज. पाटील यांनी दिली.
विषय : दीर्घ आरोग्याची गुरुकिल्ली
वक्ते : डॉ. हेमंत जोशी (ख्यातनाम बालरोगतज्ज्ञ)
वार व दिनांक : बुधवार,
दि. १ जुलै
वेळ : सायंकाळी ५ वाजता
स्थळ : शाहू स्मारक भवन, दसरा चौक, कोल्हापूर