

कोल्हापूर : कोल्हापूरकरांना दसरा-दिवाळीची खरेदी मनसोक्त करण्याची संधी देणारा ‘पुढारी दसरा-दिवाळी शॉपिंग फेस्टिव्हल 2024’ शुक्रवार (दि. 4) पासून धडाक्यात सुरू झाला. राजारामपुरी येथील डॉ. व्ही. टी. पाटील सभागृहात फेस्टिवलचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा देसाई यांच्या हस्ते झाली. उद्घाटनासाठी श्राईन इसुझूचे संचालक यासिर नदाफ यांच्या वतीने प्रदीप रेडेकर आणि रॉनिक स्मार्टचे संचालक तानाजी पवार उपस्थित होते. दैनिक ‘पुढारी’चे समूह सरव्यवस्थापक अनिल पाटील, समूह सरव्यवस्थापक (ऑपरेशन) राजेंद्र मांडवकर, विभागीय जाहिरात व्यवस्थापक शशिकांत पवार हे यावेळी उपस्थित होते.
सकाळी 10.30 ते रात्री 8.30 पर्यंत हे खरेदी पर्व सुरू राहणार आहे. सणासुदीच्या काळात लागणार्या तसेच घरगुती उपयोगाच्या सर्व वस्तूंची भव्य रेंज या ठिकाणी उपलब्ध असून या ठिकाणी स्टॉलधारकांनी भरघोस ऑफर्स दिल्या आहेत. फेस्टिव्हलमध्ये शंभरहून अधिक स्टॉल्स असून, गारमेंटस्, इलेक्ट्रॉनिक्स, ज्वेलरी, होम डेकोर, मसाले, आयुर्वेदिक उत्पादन, चहा, इन्स्टंट गुळाचा चहा मसाला, बेकरी पदार्थ यांसारख्या विविध वस्तू आणि पदार्थांवर आकर्षक ऑफर्स मिळणार आहेत. मटण मसाला, चिकन मसाला, मिसळ मसाले, विविध प्रादेशिक विभागातील खासियत असलेले मसाले यांचे भरपूर पर्याय उपलब्ध आहेत. घरगुती वस्तूंपासून गाड्यांपर्यंत सर्व काही एकाच छताखाली खरेदी करण्याची ही सुवर्णसंधी आहे. फेस्टिव्हलमध्ये ऑटोमोबाईल विभागाकरिता भव्य मंडप उभारण्यात आला असून, उन्नती मोटर्सच्या वतीने थार बॉक्स या नवीन गाडीचे अनावरणही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
या फेस्टिव्हलचे खास आकर्षण म्हणजे ऑटोमोबाईल विभाग. इथे नामांकित कंपन्यांच्या चारचाकी, दुचाकी आणि इलेक्ट्रिक गाड्यांचे मॉडेल्स उपलब्ध आहेत. उन्नती मोटर्सच्या वतीने महिंद्रा थार बॉक्स या गाडीचे या प्रदर्शनात अनावरण करण्यात आले. यावेळी पुष्कराज गाडगीळ, राजू हमनावर आणि सचिन मोरे आदी उन्नती मोटर्स अधिकारी उपस्थित होते. या प्रदर्शनात विविध कंपन्यांच्या गाड्यांचे टेस्ट ड्राईव्ह एकाच ठिकाणी घेण्याची संधी उपलब्ध आहे. ग्राहकांना थेट प्रदर्शनातूनच बुकिंग करण्याची संधी असून, स्पॉट बुकिंगवर भरघोस सूट देण्यात आली आहे.
दसरा-दिवाळीचा सण हा खरेदीचा उत्सव आहे. त्यामध्ये महिलांची भूमिका महत्त्वाची असते. त्याचबरोबर सध्या नवदुर्गांचा उत्सव सुरू असल्याने कार्यक्रमाच्या दीपप्रज्वलनाचा मान उपस्थित महिलावर्गाला देण्यात आला.