कोल्हापूर : करिअर निवडताना केवळ पारंपरिक पर्याय किंवा गुणांवर अवलंबून न राहता स्वतःची आवड, क्षमता, कौशल्ये व भविष्यातील संधी, शिकण्याची धडपड हे घटक महत्त्वाचे आहेत. भविष्यातील तंत्रज्ञान व उद्योगातील बदल, फक्त पदवी नव्हे तर इतर कौशल्ये, नवीन बहुशाखाविषयक पर्यायांचा विचार केल्यास यशस्वी करिअर करणे शक्य आहे, असा सूर ‘पुढारी’ माध्यम समूहातर्फे ‘पुढारी कॅम्पस टू करिअर’ उपक्रमात मान्यवरांच्या मार्गदर्शनातून उमटला.
‘पुढारी’ माध्यम समूहातर्फे ‘पुढारी कॅम्पस टू करिअर’ या उपक्रमाचा शनिवारी (दि. ६) कोल्हापुरात थाटात शुभारंभ झाला. याप्रसंगी शहर परिसरातील बारावी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांनी उपक्रमास शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, स्पर्धेच्या युगात नवनवीन अभ्यासक्रम येत असून पालकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. प्रत्येक विद्यार्थ्यात विशेष गुण असतो, त्याला पुढे नेण्याचे काम शिक्षकांनी करावे.
करिअर निवडताना स्वत:ची आवड लक्षात घ्या : प्रा. लाहोटी
विश्वकर्मा विद्यापीठ पुणेचे संचालक प्रा. डॉ. युवराज लाहोटी म्हणाले, शिक्षणातील अनेक क्षेत्र माहीत नसल्याने अडचणी वाढतात. मेडिकल व इंजिनिअरिंगकडे ७२ टक्के विद्यार्थ्यांचा कल दिसतो. परंतु यापेक्षा करिअरची खूप क्षेत्रं आहेत. विद्यार्थ्यांनी करिअर निवडताना स्वत:ची आवड लक्षात घ्यावी. चांगल्या कॉलेजबरोबर कोर्सही महत्त्वाचा आहे. २५ वर्षांपूर्वी इंजिनिअरिंगच्या काही कोर्सेससाठी रांगा होत्या. आज हे चित्र बदलले असून कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे (एआय) हजारो नवीन रोजगार निर्माण होणार आहेत.
डेटा सायन्स, मशिन लर्निंग, डेटा ॲनालिटिकलसारख्या नवीन गोष्टी आल्या आहेत. बीबीए, बीसीएसारखे कोर्सेस सुरू आहेत. ग्राफिक, ऑटोमेशन, प्रोफेशनल्स, फॅशन डिझाईनच्या क्षेत्रात भरपूर संधी आहेत. एअरपोर्ट विकसित होत असून त्याठिकाणी ९०० पद्धतीचे कामे असून हजारो रोजगार उपलब्ध आहेत. याचा विद्यर्थ्यांनी विचार केल्यास यशस्वी करिअर करणे शक्य आहे.
‘एआय’मुळे रोजगाराच्या हजारो संधी निर्माण होणार : डाॅ. देशपांडे
कॅम्पस देखो डॉट एआयचे मेंटॉर डॉ. शंतनू देशपांडे म्हणाले, १५ वर्षापूर्वी काय होते, याचा विचार करण्यापेक्षा २०४० मध्ये कोणती क्षेत्रं असतील यातच करिअरच्या अनेक संधी दडल्या आहेत. काही वर्षांपूर्वी संगणक आल्यानंतर नोकऱ्या जातील, असे म्हणत होते. परंतु रोजगाराच्या नवीन संधी निर्माण झाल्या. आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात आता कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) शिक्षण क्षेत्रात मोठा वापर सुरू झाला आहे. प्रत्येकाने त्याचे ज्ञान आत्मसात केले तरच स्पर्धेत टिकता येणार आहे. एआयचा विविध क्षेत्रातील वापर आज महत्त्वाचा ठरत असून याकडे विद्यार्थ्यांनी गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.
मार्केटिंग क्षेत्रात चांगले करिअर असून इंडस्ट्रीचे ज्ञानाबरोबर नवनवीन कौशल्ये महत्त्वाची आहेत. आगामी काळात कोल्हापुरात कन्स्ट्रक्शन व्यवसायाला चांगले दिवस येणार आहेत. त्याठिकाणी सिव्हिल इंजिनिअर्स लागतील. हॉटेल मॅनेजमेंट, आर्किटेक्चर, ऑटोमोबाईल क्षेत्रात करिअरच्या संधी आहेत. विद्यार्थ्यांनी करिअर निवडताना पहिल्यांदा चांगले कॉलेज पाहावे. आवडता कोर्स निवडून त्यात करिअरचे ध्येय ठेवावे. गेट, जीआरई, कॅट यासह यूपीएससी व एमपीएससीसारख्या स्पर्धा परीक्षा दिल्यास यशस्वी करिअर शक्य आहे.
सायबर सिक्युरिटी एक्स्पर्ट आव्हानात्मक करिअर : प्रा. शेवकर
पिंपरी-चिंचवड विद्यापीठ स्कूल ऑफ कॉम्प्यूटर ॲप्लिकेशनचे सहायक प्रा. मोहित शेवकर म्हणाले, करिअर निवडताना केवळ गुणवत्तेवर अवलंबून न राहता विषयातील ‘आवड’ व ‘कुतूहल’ यांना प्राधान्य द्यावे. सायबर सिक्युरिटी हे क्षेत्र रोज नवीन आव्हाने व शिकण्याची संधी देणारे आहे. त्यामुळे तंत्रज्ञानाची आवड असणाऱ्यांसाठी ‘एक्सायटिंग’ क्षेत्र आहे. माहिती जितकी मौल्यवान, तितका सायबर धोका जास्त असतो. सोशल मीडियाद्वारे ओळखीच्या व्यक्तीच्या नावाने पैशांची मागणी करणे, पासवर्ड हॅक करणे आणि वैयक्तिक माहिती चोरणे हे सध्याचे मुख्य धोके आहेत.
कंपन्यांच्या सिस्टीम हॅक करून महत्त्वाची व्यावसायिक माहिती चोरणे हा उद्योगांसाठी मोठा चिंतेचा विषय बनला आहे. सायबर गुन्ह्यांच्या वाढत्या घटना पाहता कुशल मनुष्यबळाची नितांत गरज आहे. विद्यार्थ्यांनी एथिकल हॅकिंग आणि मालवेअर ॲनॅलिसिस यांसारखे विषय शिकून उज्ज्वल भविष्य घडवावे.
पारंपरिक करिअरपेक्षा अनेक नावीन्यपूर्ण संधी उपलब्ध : प्रा. अगरवाल
डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे प्रवेश विभागप्रमुख मुकेश अगरवाल म्हणाले, इंजिनिअरिंग कॉलेज निवडताना ऑप्शन फॉर्म्स व कटऑफबाबतची सर्व तांत्रिक माहिती घेऊन विद्यार्थ्यांनी डोळसपणे प्रवेश प्रक्रियेत सहभागी व्हावे. आजच्या काळात पारंपरिक करिअरपेक्षा अनेक वेगळ्या संधी आहेत. प्रत्येक विद्यार्थ्याला मोठे पॅकेज हवे असते, पण ते मिळाल्यानंतर त्याचे सुरक्षित नियोजन गरजेचे आहे. वेल्थ मॅनेजमेंटला महत्त्व आले आहे. वेल्थ मॅनेजमेंट एक्स्पर्टची आवश्यकता आहे, त्यामुळे या पर्यायाचा विद्यार्थ्यांनी विचार करावा.
आता करिअरचे स्वरूप इंटर-डिसिप्लिनरी व मल्टी-डिसिप्लिनरी झाले आहे. येणाऱ्या काळात फॉरेन्सिक एक्स्पर्टची गरज वाढणार आहे. विद्यार्थ्यांनी फक्त नोकरी मिळवण्याचा दृष्टिकोन न ठेवता समस्यांचा अभ्यास करावा. समस्या खूप आहेत आणि त्यावर उपाय शोधण्याचे कौशल्य जर विद्यार्थ्यांकडे असेल, तर तिथेच त्यांचे खरे यशस्वी करिअर दडलेले आहे.
स्टार्टअपचे आव्हान स्वीकारा : प्रा. गटे
डिजिटल रोबोटिक्सचे अध्यक्ष प्रा. अजित गटे म्हणाले, आता गुणांऐवजी कौशल्ये महत्त्वाची आहेत हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवले पाहिजे. शिक्षण, करिअर व आयुष्यात स्थिर होण्याच्या गोष्टी वेळेच्या वेळी झाल्या पाहिजेत. सध्या कंपन्या विद्यार्थ्यांना सिलेक्ट करतात. परंतु विद्यार्थ्यांकडे असे कौशल्य असले पाहिजे की, त्यांना स्वतः कंपन्या सिलेक्ट करण्याचा पर्याय मिळेल.
राज्यातील शंभर व्यावसायिक महाविद्यालयात स्किल व इंटरप्रिन्युअर डेव्हलपमेंट सेंटर सुरू करण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमात सहभागी होऊन सगळे मिळून इंडस्ट्री व एज्युकेशन सेक्टर यांच्यातील ब्रिज म्हणून काम करूया, असे आवाहन त्यांनी केले. प्रा. गणेश चिंचकर यांनी सूत्रसंचालन केले. कॅम्पस देखो डॉट एआयचे ॲकेडमिक हेड सार्थक दातीर यांनी आभार मानले. यावेळी दै. ’पुढारी’ पुणेचे जनरल मॅनेजर डॉ. सुनील लोंढे स्वागत केले. दै. ‘पुढारी’चे जाहिरात विभागीय व्यवस्थापक बाळासाहेब नागरगोजे, कॅम्पस देखो डॉट एआयचे मॅनेजिंग डायरेक्टर दीपक भोसले, वितरण व्यवस्थापक अशोक पाटील, शिवाजी पाटील आदी उपस्थित होते.
‘कॅम्पस टूर’मध्ये सहभागी होण्याची सुवर्णसंधी
‘कॅम्पस टू करिअर’ या उपक्रमात सहभागी झालेल्या व नावनोंदणी केलेल्या शंभर विद्यार्थ्यांना पुण्यातील चार कॉलेजचे कॅम्पस प्रत्यक्ष पाहण्याची संधी मिळणार आहे. जुलै महिन्यात ही कॅम्पस टूर निघणार आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी यासाठी नोंदणी करावी, असे आवाहन ‘पुढारी’च्या वतीने करण्यात आले आहे.