कोल्हापूर : ‘कोल्हापूर म्हणजे ‘पुढारी’ आणि ‘पुढारी’ म्हणजेच कोल्हापूर’ अशा निस्सीम प्रेमाची साक्ष देत, पिढ्यान्पिढ्यांचे ऋणानुबंध अधिक द़ृढ करत लोटलेल्या अलोट जनसागराने दैनिक ‘पुढारी’वर शुभेच्छांचा वर्षाव केला. प्रत्येक कोल्हापूरकराशी अकृत्रिम जिव्हाळ्याचे आणि आपुलकीचे नाते जोडलेल्या ‘पुढारी’ने निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारितेची 86 वर्षे यशस्वी परंपरा जपत, तमाम कोल्हापूरकरांच्या साक्षीने बुधवारी 87 व्या वर्षात दिमाखदार पदार्पण केले. ऐतिहासिक टाऊन हॉलमध्ये वर्धापन दिनाचा सोहळा रंगला.
कोल्हापूरकरांच्या हृदयावर अढळ स्थान निर्माण केलेला दै. ‘पुढारी’चा बुधवारी वर्धापन दिन सोहळा अपूर्व उत्साहात साजरा झाला. स्वातंत्र्यलढ्यातील अग्रणी भागीदार आणि साक्षीदार असलेल्या, सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी सदैव आग्रही भूमिका घेणारा दै. ‘पुढारी’चा वर्धापन दिन म्हणजे कोल्हापूरवासीयांसाठी नववर्षाच्या शुभारंभाचा आनंददायी आणि कौटुंबिक सोहळाच ठरला.
मावळतीला जाणार्या रविकिरणांची उधळण आणि आकर्षक विद्युत रोषणाईने नटलेल्या ऐतिहासिक टाऊन हॉल उद्यानाचे सौंदर्य सायंकाळी आणखी खुलून गेले होते. भाऊसिंगजी रोडवर उभारलेली भव्य स्वागत कमान, ‘पुढारी’ माध्यम परिवाराकडून केले जाणारे स्वागत आणि लाल कार्पेटने अच्छादलेल्या, विद्युत रोषणाईने उजळलेल्या प्रवेशमार्गावरून, भारत राखीव बटालियनच्या बँडच्या सुमधुर धूनने मंत्रमुग्ध झालेल्या आणि उत्साह व आनंदाने भारलेल्या वातावरणात कोल्हापूरकर मुख्य समारंभस्थळी येत होते.
‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव, दै. ‘पुढारी’चे समूह संपादक व ‘पुढारी’ माध्यम समूहाचे चेअरमन डॉ. योगेश जाधव, राजवीर योगेश जाधव यांचे सायंकाळी आगमन झाले आणि स्वागत सोहळ्याला सुरुवात झाली. डॉ. प्रतापसिंह जाधव, डॉ. योगेश जाधव, राजवीर जाधव यांना ‘पुढारी’ वर्धापन दिनासह नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या जात होत्या. ‘पुढारी’च्या आठवणींनाही उजाळा देत कोल्हापूरकर डॉ. जाधव यांच्याशी हितगूज करत होते. व्यासपीठावरून शुभेच्छा देऊन खाली उतरताच तमाम कोल्हापूरकरांचा स्नेहमेळावा रंगत होता. एकमेकांना नववर्षाच्या शुभेच्छा देत, एकमेकांची विचारपूस करत गप्पांचा फड रंगत होता.
वर्धापन दिनानिमित्त राज्याचे रोजगार हमी, फलोत्पादनमंत्री भरत गोगावले, खासदार शाहू महाराज, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष, आमदार राजेश क्षीरसागर, खासदार धनंजय महाडिक, आमदार चंद्रदीप नरके, आमदार डॉ. अशोकराव माने, आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, आमदार प्रा. जयंत आसगावकर, तासगावचे आमदार रोहित आर. पाटील, जिल्हाधिकारी अमोल येडगे, महापालिकेच्या आयुक्त के. मंजुलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., सांगली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, इचलकरंजी महापालिकेचे आयुक्त ओमप्रकाश दिवटे, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, हुतात्मा उद्योग समूहाचे वैभव नायकवडी, माजी खासदार प्रा. संजय मंडलिक, माजी राज्यमंत्री भरमू सुबराव पाटील, माजी आमदार मालोजीराजे, के. पी. पाटील, प्रकाश आवाडे, सुजित मिणचेकर, जयश्री जाधव, महावितरणचे मुख्य अभियंता स्वप्निल काटकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता तुषार बुरूड, प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर, भूमिअभिलेख अधीक्षक शिवाजी भोसले, मुद्रांक जिल्हाधिकारी बाबासाहेब वाघमोडे, करवीरचे प्रांताधिकारी हरिष धार्मिक, पन्हाळ्याचे प्रांताधिकारी समीर शिंगटे, कोल्हापूर विमानतळ संचालक अनिल शिंदे, जिल्हा उपनिबंधक नीळकंठ करे, सहायक कामगार आयुक्त विशाल घोडके, महापालिका अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, एस.टी.चे विभाग नियंत्रक शिवराज जाधव, देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवडे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुहास वाईंगडे, जिल्हा माहिती अधिकारी सचिन आडसूळ, विभागीय उच्च सहशिक्षण संचालक डॉ. धनराज नाकाडे, अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त उदय लोहकरे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. हर्षला वेदक, ‘गोकुळ’चे अध्यक्ष अरुण डोंगळे, ‘स्मॅक’चे अध्यक्ष सुरेंद्र जैन, चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे, जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. सर्जेराव खोत, क्रिडाईचे अध्यक्ष के. पी. खोत, सराफ संघाचे अध्यक्ष राजेश राठोड, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, भाजपचे महेश जाधव, राहुल चिकोडे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, भाकपचे सतीशचंद्र कांबळे, कॉ. दिलीप पवार, मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक आदींसह सर्वच क्षेत्रांतील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.
वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहताना हार-पुष्पगुच्छ आणण्याऐवजी बालकल्याण संकुलासाठी मदत निधी द्या, असे आवाहन ‘पुढारी’ माध्यम परिवाराने केले होते. ‘पुढारी’च्या या आवाहनाला कोल्हापूरकरांनी चांगला प्रतिसाद देत बालकल्याण संकुलला मदत निधी दिला.
या सोहळ्यात भारत राखीव बटालियन क्रमांक तीनच्या बँडने आणखी रंगत आणली. देशभक्तीपर गीतांसह धार्मिक आणि विविध गाजलेल्या गीतांच्या धून सादर करत टाऊन हॉल उद्यानातील वातावरण अधिक प्रसन्न केले. बँड पथकप्रमुख, पोलिस हवालदार मुकुंद साठे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी बँडचे सादरीकरण केले.
वर्धापन दिनाचा स्नेहमेळावा सायंकाळी होता. मात्र, सकाळपासूनच दैनिक ‘पुढारी’च्या मुख्य कार्यालयात शुभेच्छांसाठी मान्यवरांनी गर्दी केली होती. राज्याचे रोजगार हमी योजना, फलोत्पादन आणि खारभूमी विकासमंत्री भरत गोगावले यांनी ‘पुढारी’ कार्यालयात येऊन डॉ. प्रतापसिंह जाधव, डॉ. योगेश जाधव व राजवीर जाधव यांना शुभेच्छा दिल्या. गोगावले यांच्या हस्ते डॉ. प्रतापसिंह जाधव यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विकास गोगावले, विलासराव पाटील आदी उपस्थित होते. पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित, माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा मंडळाचे कोल्हापूर विभागीय अध्यक्ष राजेश क्षीरसागर, कोल्हापूर फौंड्री क्लस्टरचे अध्यक्ष दीपक चोरगे, ‘गोशिमा’चे अध्यक्ष स्वरूप कदम, निमंत्रित संचालक विनय चौगुले, जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी आदींनी शुभेच्छा दिल्या. दरम्यान, दिवसभर विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी फोनवरूनही शुभेच्छा दिल्या.
ज्येष्ठ नेते, खा. शरद पवार यांनी दै. ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांना दूरध्वनी करून दै. ‘पुढारी’च्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. यावेळी पवार यांनी ‘पुढारी’ने वर्धापन दिनानिमित्त प्रकाशित केलेल्या ‘कृत्रिम बुद्धिमत्ता महाक्रांती’ या पुरवणीचे कौतुक केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून ते या क्षेत्रातील तज्ज्ञांचे लेख प्रसिद्ध केले आहेत. हे सर्वच लेख अत्यंत अभ्यासपूर्ण आणि संपूर्ण देशाला ‘एआय’ क्रांतीचे महत्त्व दाखवून देणारे आहेत. ‘पुढारी’ने पुरवणीसाठी हा विषय निवडला हेच मुळात कौतुकास्पद आहे. हे सर्व लेख देशभरात हिंदी, इंग्रजी भाषेतूनही गेले पाहिजेत, अशी अपेक्षाही पवार यांनी यावेळी डॉ. जाधव यांच्याशी बोलताना व्यक्त केली. सुमारे 15 मिनिटे उभयंतांनी एकमेकांची विचारपूस करत विविध विषयांवर चर्चाही केली.