

कोल्हापूर : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी संलग्न महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून आकारण्यात आलेला ज्युबिली फंडाच्या विरोधात शनिवारी शिवाजी विद्यापीठाच्या अधिसभेत घुसण्याचा प्रयत्न केला. मुख्य प्रवेशद्वारासमोर जोरदार घोषणाबाजी करीत निदर्शने केली. यावेळी संतप्त कार्यकर्ते सिनेटमध्ये घुसताना पोलिस व सुरक्षा रक्षकांशी झटापट झाली. यावेळी आत घुसणार्या कार्यकर्त्यांना पोलिस आणि विद्यापीठ सुरक्षारक्षकांनी मारहाण केली. सिनेटमध्ये या घटनेचे तीव— पडसाद उमटले. सदस्यांनी याचा निषेध नोंदवत दोषींवर कारवाईची मागणी केली.
विद्यापीठाची अधिसभा सिनेट सभागृहात सकाळी 11 वाजता सुरू झाली. काही वेळानंतर दुपारी 1 च्या सुमारास ‘अभाविप’चे अनेक कार्यकर्ते आले. त्यांनी कुलगुरूंना निवेदन द्यायचे आहे, आम्हाला आत सोडा, अशी सुरक्षारक्षकांकडे मागणी केली. पोलिस व सुरक्षारक्षकांनी त्यांना आत जाऊ न दिल्याने प्रवेशद्वाराजवळ ठिय्या देत घोषणाबाजी करीत आंदोलन सुरू केले. याप्रसंगी त्यांनी फलक झळकवत जोपर्यंत विद्यापीठ प्रशासन लेखी देत नाही, तोपर्यंत जाणार नसल्याची आक्रमक भूमिका घेतली. यामुळे गोंधळाचे वातावरण होते.
पोलिस व सुरक्षा रक्षक प्रमुख यांनी अधिसभेत जाऊन घडलेल्या प्रकाराची माहिती कुलगुरू व कुलसचिव यांना दिली. थोड्यावेळाने कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांनी सभागृहातून मुख्य प्रवेशद्वाराजवळ जाऊन अभाविप कार्यकर्त्यांकडून निवेदन स्वीकारले. यावेळी कार्यकर्त्यांनी आम्हाला लेखी द्या, अशी मागणी केली. मात्र, कुलसचिवांनी अधिसभा सुरू असल्याचे कारण देत थोड्या कालावधीनंतर लेखी म्हणणे देतो, असे सांगत पुन्हा अधिसभेत निघून गेले. यावेळी कार्यकर्ते व कुलसचिव यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. थोड्यावेळाने ‘अभाविप’ कार्यकर्त्यांनी मुख्य प्रवेशद्वारातून आत जाण्याचा प्रयत्न केला. पोलिस व सुरक्षकांनी त्यांना अडविले. यावेळी त्यांच्यात बाचाबाची झाली. पोलिस व सुरक्षा रक्षकांनी कार्यकर्त्यांना बाजूला करत मारहाण केली.
सिनेटमध्ये तीव्र पडसाद...
या घटनेचे पडसाद अधिसभा बैठकीत उमटले. अधिसभा सदस्य अमित कुलकर्णी, रतन कांबळे व श्रीनिवास गायकवाड यांनी विद्यार्थी, कार्यकर्त्यांना मारहाणीचा निषेध केला. ज्ञान मंदिराच्या दारात विद्यार्थ्यांवर हात उचलला जातो, याचा निषेध करीत पोलिस व सुरक्षा रक्षकांनी आंदोलक हे विद्यार्थी असल्याचे भान ठेवायला हवे होते, याची जाणीव करून दिली. सदस्य श्वेता परुळेकर व अॅड. अभिषेक मिठारी यांनी घडलेल्या घटनेचा निषेध करीत दोन्ही बाजू समजून घेऊन रीतसर कारवाई करावी, अशी भूमिका मांडली. दोषींवर कारवाईचे आश्वासन मिळाल्यानंतर सदस्य शांत बसले.
दोन होमगार्ड अन् महिला सुरक्षारक्षक जखमी...
अधिसभा सुरू असताना ‘अभाविप’च्या कार्यकर्त्यांनी मुख्य प्रवेशद्वारातून आत घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिस, सुरक्षा व कार्यकर्ते यांच्यात झटापट झाली. यात दोन होमगार्ड व महिला सुरक्षारक्षक कर्मचारी जखमी झाली. घटनास्थळी गोंधळ निर्माण झाल्याने पोलिस व सुरक्षा रक्षकांकडून कार्यकर्त्यांना मारहाण झाली. यामुळे काही काळ परिसरात तणाव निर्माण झाला.