कागल : कागल शहराच्या जनतेला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले. येथील जनतेनेही मला जीवापाड प्रेम आणि पाठबळ दिले, असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण विशेष सहाय्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. कागल शहरात आयोजित शाहूनगर बेघर वसाहतीसह संपर्क बैठकांमधून मुश्रीफ बोलत होते. सोबत ज्येष्ठ नेते चंद्रकांत गवळी, केडीसीसी बँकेचे संचालक भैया माने, माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर उपस्थित होते. मंत्री मुश्रीफ म्हणाले, कागल गडहिंग्लज व उत्तूर विधानसभा मतदारसंघातील खेड्या-पाड्यांचा आणि वाड्या-वस्त्यांचा विकास केलाच, शिवाय कागल शहरासह मुरगूड, गडहिंग्लज ही शहरे विकासाच्या नकाशावर अग्रभागी ठेवली. गेल्या पंचवीस-तीस वर्षांच्या राजकीय आणि सामाजिक वाटचालीत जनता आणि आपल्यात ॠणानुबंध, आपुलकी आणि आत्मीयतेचे एक घट्ट नाते निर्माण झाले आहे.
भैया माने म्हणाले, आतापर्यंतच्या वाटचालीत कोणत्या गावाने किंवा कुठल्या वार्डात किती मते मिळाली, याकडे मंत्री मुश्रीफ यांनी कधीच पाहिले नाही. सगळ्या गावांचा विकास, हाच त्यांचा ध्यास राहिला आहे. शाहूनगर बेघर वसाहत येथील बैठकीत स्वागत व प्रास्ताविक संतोष रजपूत यांनी केले. माजी उपनगराध्यक्ष प्रवीण काळबर, राष्ट्रवादी शहराध्यक्ष संजय चितारी, माजी नगरसेवक सतीश घाटगे, माजी उपनगराध्यक्ष सौरभ पाटील, सुनील माळी, अर्जुन नाईक, भरत सोनटक्के, आकाश मकवाने, पंकज खलीफ, शशिकांत नाईक, महादेव भोकटे, अजित खोत, राजमहंमद शेख, सागर चांदेकर, जावेद जमादार, संतोष परीट, अमित जमादार व समस्त वड्डवाडी, गोसावी वसाहत, कुरणे वसाहत, शाहू कॉलनी, यशिला पार्क, खोत मळा, चांदेकर मळा, जमादार मळा, वाघरे मळा, तट्टा चाळ येथील ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्व. विक्रमसिंह घाटगे यांनी सहकारात दीपस्तंभाप्रमाणे काम केले आहे, असे सांगत प्रकाश गाडेकर म्हणाले, छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याची टिमकी मिरवणार्या समरजित घाटगे यांनी या कारखान्यावर 250 कोटी कर्ज केले आहे. अनेकदा जाहीरपणे विचारणा करूनही ते यावर ‘ब—’ काढायला तयार नाहीत, उलट चोराच्या उलट्या बोंबा. आमच्यावरच बिनबोभाट आरोप करत सुटले आहेत.