

कोल्हापूर : संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या व्यवस्थापनाचे खासगीकरण करण्याचा प्रस्ताव चर्चेअंती महापालिका महासभेत सोमवारी मंजूर करण्यात आला. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर रूपाराणी निकम हाेत्या. त्यामुळे नूतनीकरणानंतर आता नाट्यगृहात खासगी व्यवस्थापन असेल. मात्र तिकिटाचे दर ठरविण्यापासून सर्व अधिकार प्रशासनाकडे राहणार आहेत.
उत्पन्न ३८ लाख; खर्च १.७ कोटी
आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड म्हणाले, नाट्यगृहात वर्षाला ४५० कार्यक्रम होतात. त्यातून ३८ लाख उत्पन्न मिळते. मात्र खर्च १ कोटी ७ लाख रु. होतो. ६० ते ७० लाख तोट्यात नाट्यगृह चालविले जात आहे. आता नूतनीकरणासाठी सुमारे ३५ कोटी खर्च झाला आहे. नाट्यगृहासाठी साऊंडमन, लाईटमनसह इतर तंत्रज्ञही त्या क्षेत्रातील तज्ज्ञ पाहिजेत. महापालिका कर्मचाऱ्यांची नियुक्ती केल्यास ते तज्ज्ञ नसल्याने खराब होतील. त्यामुळे व्यवस्थापन बाह्य संस्थेकडे द्यावे. महापालिकेच्या त्यावर सनियंत्रण असेल.
शहरवासीयांसाठी कलाकार फुकट कार्यक्रम करणार?
महापौर निकम म्हणाल्या, सर्व नुकसान सोसून महापालिकेने सुविधा पुरविणे चुकीचे आहे. रंगकर्मी व नवोदित कलाकार यांचा विचार केला जाईल. मात्र कलाकार शहरवासीयांसाठी फुकट कार्यक्रम करणार आहेत का? तरीही सर्वांचा विचार करून कार्यक्रमाचे दर ठरविले जातील. कुणाचेही नुकसान होणार नाही.