

आशिष आडिवरेकर
कोल्हापूर : जिल्ह्यात चार नवीन पोलिस ठाण्यांच्या निर्मितीचा सविस्तर प्रस्ताव पोलिसांनी गृह विभागास पाठविला आहे. यामध्ये शाहूपुरीचे विभाजन करून कसबा बावडा, राजारामपुरीचे विभाजन करून सुभाषनगर, चंदगडचे विभाजन करून मजरे कार्वे, तर शिवाजीनगर (इचलकरंजी) व हातकणंगले पोलिस ठाण्याचे विभाजन करून कबनूर येथे नवीन पोलिस स्टेशनला मंजुरी मिळावी, अशी मागणी केली आहे.
शाहूपुरी पोलिस ठाण्यांतर्गत न्यू पॅलेस, कसबा बावडा, रमणमाळा, भोसलेवाडी, सदरबाजार, मुक्त सैनिक या भागांचे विभाजन होणार आहे. तर राजारामपुरी आणि `करवीर`मधील आर.के.नगर, मोरेवाडी, पाचगाव, रायगड कॉलनी, जरगनगर, रामानंदनगर, जवाहरनगर, राजेंद्रनगर, मोतीनगर हा परिसर सुभाषनगर पोलिस चौकीत समाविष्ट होणार आहे. चंदगड पोलिस ठाण्याअंतर्गत येणारी ८२ गावे घेऊन मजरे कार्वे पोलिस ठाण्याची निर्मिती केली जाणार आहे. तर इचलकरंजी शहराची वाढीव हद्द, चंदुर, कबनूर, रुई या गावांसह कबनूर पोलिस स्टेशनचा प्रस्ताव पाठविला आहे.
नवीन प्रस्ताव परिपूर्ण पोलिस अधीक्षक निलोत्पल
यांनी चारही पोलिस ठाण्यांसाठीचा परिपूर्ण प्रस्ताव तयार करून पाठविला आहे. यामध्ये गुन्हेगारी टोळ्या, गुन्ह्यांची आकडेवारी, औद्योगिक वसाहत, आर्थिक उलाढाल, राजकीय परिस्थिती, वाढलेली लोकसंख्या, आवश्यक मनुष्यबळ, खर्च, साधनसामुग्री, वाहन संख्या असा सविस्तर मागणी अहवाल शासनास पाठविला आहे.
नागरिकांच्या दृष्टीने सोयीस्कर
चंदगड पोलिस ठाण्याच्या अंतर्गत असणारी गावे ३० ते ३५ किलोमीटर लांब आहेत. यामुळे तेथील नागरिकांना पोलिस स्टेशनसाठी लांबचा प्रवास करावा लागतो. याचसोबत करवीरमधील काही गावे सुभाषनगरमध्ये समाविष्ट केल्यानंतर तेथील नागरिकांनाही याचा फायदा होणार आहे. याचसोबत पोलिसांनाही प्रशासकीय आणि कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने सोयीस्कर होणार आहे.
प्रत्येक पोलिस ठाण्याला संख्याबळाची गरज
पोलिस निरीक्षक : १
सहायक पोलिस निरीक्षक : ३
पोलिस उपनिरीक्षक : ९
सहायक फौजदार : १५
पोलिस हवालदार : ४२
पोलिस शिपाई : ७४
एकूण : १४४