Dr. D Y Patil: प‌द्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन

D Y PATIL Healt Update: ज्ञानाची गंगा घरोघरी पोहोचवणाऱ्या एका ज्ञानपर्वाचा अस्त झाला.
Dr D Y PATIL
Dr D Y PATILPUDHARI
Published on
Updated on

Dr. D Y Patil Passes Away

कोल्हापूर : महाराष्ट्राच्या शैक्षणिक आणि सामाजिक पटलावर आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणारे जेष्ठ शिक्षणतज्ज्ञ, माजी आमदार, त्रिपुरा, बिहार व पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. ज्ञानदेव यशवंतराव पाटील तथा डॉ. डी. वाय. पाटील (दादा) यांचे मंगळवारी सकाळी निधन झाले. कसबा बावडा येथील ज्ञानशांती या त्यांच्या निवासस्थानी वयाच्या ९१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. त्‍यांच्‍यावर घरीच उपचार सुरू होते.

कोल्हापूर जिल्ह्यातून सुरू झालेला प्रवास देशातील एका मोठ्या शैक्षणिक आणि सामाजिक साम्राज्याच्या रूपात उभा करणाऱ्या, ज्ञानाची गंगा घरोघरी पोहोचवणाऱ्या एका ज्ञानपर्वाचा अस्त झाला.

डॉ. डी. वाय. पाटील यांचा राजकीय व सार्वजनिक आयुष्याचा प्रवास अगदी तळागाळातून झाला. १९५७ ते १९६२ या काळात त्यांनी कोल्हापूर नगरपालिकेचे सदस्य म्हणून जबाबदारी सांभाळली. त्यानंतर १९६७ आणि १९७२ च्या विधानसभा निवडणुकीत ते पन्हाळा मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर आमदार म्हणून निवडून आले.

काँग्रेस पक्षातील त्यांच्या प्रदीर्घ आणि निष्ठावंत सेवेची दखल घेत तत्कालीन केंद्र सरकारने नोव्हेंबर २००९ मध्ये त्यांची त्रिपुराच्‍या राज्यपालपदी नियुक्ती केली. मार्च २०१३ मध्ये त्यांनी बिहारचे राज्यपाल म्हणून सूत्रे हाती घेतली. यांनंतर काही काळ पश्चिम बंगालच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभारही त्‍यांनी समर्थपणे सांभाळला. डिसेंबर २०१८ मध्‍ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षमध्‍ये प्रवेश केला होता. सर्वाधिक काळ काँग्रेसचे असलेल्या डॉ. डी. वाय. पाटील हे राजकीय वर्तुळातील सर्वपक्षीय नेत्यांशी सलोख्याचे संबंध असणारे दिलदार नेते, अशी त्‍यांची महाराष्‍ट्रात ओळख होती.

महाराष्ट्रात व्यावसायिक आणि तांत्रिक शिक्षणाचे खासगीकरण करून ते सामान्यांपर्यंत पोहोचवण्यात डॉ. डी वाय पाटील यांनी अग्रदूत म्हणूनच भूमिका बजावली. १९८३ साली त्यांनी नवी मुंबई येथे रामराव आदिक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या पहिल्या अभियांत्रिकी महाविद्यालयाची स्थापना केली.

तुम्ही जर तुमचे अंगीकृत कार्य मनापासून स्वीकारले असेल तर तुम्हाला दुःख, त्रास किंवा सुख या भावना स्पर्श करणार नाहीत, असे सांगणाऱ्या डॉ. डी. वाय. पाटील यांनी शैक्षणिक क्षेत्रात झोकून दिले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन झालेल्या डी वाय पाटील समूहामध्ये अभिमत विद्यापीठे आणि शैक्षणिक संस्था संपूर्ण देशभर आणि परदेशातही कार्यरत आहेत. अभियांत्रिकी, वैद्यकीयमध्ये एमबीबीएस, आयुर्वेदिक, फार्मसी. हॉटेल मॅनेजमेंट आणि कृषी विज्ञान केंद्रांपर्यंत या संस्थांचे जाळे पसरले आहे. पुणे पिंपरी, आकुर्डी, नवी मुंबई (नेरुळ) आणि कोल्हापूर येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे त्यांच्या शैक्षणिक संस्थांचे विशाल कॅम्पस त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील उत्तुंग कार्याची साक्ष देत उभे आहेत.

डॉ. डी. वाय पाटील यांनी शैक्षणिक विस्तारासोबतच सामाजिक भान जपत नवी मुंबई, पुणे, कोल्हापूर येथे सुपर स्पेशालिटी चॅरिटेबल हॉस्पिटल सुरू केली. येथे गरजूंवर मोफत उपचार केले जातात. क्रीडा क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेले डी. वाय. पाटील स्टेडियम ही त्यांचीच देण आहे.

१९९४ ते १९९७ या काळात त्यांनी अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे अध्यक्षपद भूषवत देशाच्या तांत्रिक शिक्षण धोरणाला दिशा दिली. समाजकार्य आणि शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल भारत सरकारने १९९१ साली पद्मश्री पुरस्कार प्रदान करून त्‍यांचा सन्मान केला. त्‍यांना ब्रिटनच्या नॉटिंगहॅम ट्रेंट युनिव्हर्सिटीसह अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांकडून सन्मानित करण्यात आले होते. तसेच शिवाजी विद्यापीठाने २०१५ मध्ये त्यांचा डी. लिट देऊन गौरव केला होता.

शैक्षणिक विस्तारासोबतच सामाजिक भान जपत त्यांनी नवी मुंबई, पुणे, कोल्हापूर येथे सुपर स्पेशालिटी चॅरिटेबल हॉस्पिटल सुरू केली. जिथे गरजूंवर मोफत उपचार केले जातात. क्रीडा क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेले 'डी. वाय. पाटील स्टेडियम' ही त्यांचीच देण आहे. १९९४ ते १९९७ या काळात त्यांनी अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे अध्यक्षपद भूषवत देशाच्या तांत्रिक शिक्षण धोरणाला दिशा दिली. समाजकार्य आणि शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल भारत सरकारकडून त्यांचा १९९१ साली पद्मश्री पुरस्कार प्रदान करून त्यांचा सन्मान केला. ब्रिटनच्या नॉटिंगहॅम ट्रेंट युनिव्हर्सिटीसह अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांकडून सन्मानित करण्यात आले. शिवाजी विद्यापीठाने २०१५ मध्ये त्यांचा डी.लिट देऊन गौरव केला.

शेगावच्या श्री गजानन महाराजांचे निस्सीम भक्त असलेले डॉ. डी. वाय. पाटील आपल्या यशाचे श्रेय नेहमी महाराज, संताच्या आशीर्वादाला देत असत. समाजकारण, राजकारण यासह शैक्षणिक क्षेत्रात अतुलनीय काम करणाऱ्या डॉ. डी वाय पाटील यांनी अध्यात्माची साथ कधी सोडली नाही. प्रचंड लोकसंग्रह असलेल्या डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाचे वृत्त समजताच कसबा बावड्यातील त्यांच्या निवासस्थानी विविध क्षेत्रातील मान्यवरांसह सर्वसामान्यांना धाव घेतली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news