

कोल्हापूर : महापालिकेत ठेकेदारांना कामे मिळविण्यासाठी मोठ्या प्रमाणात टक्केवारी द्यावी लागते. त्यामुळे या सर्व प्रकरणांत अधिकारी व त्यांच्या संपत्तीची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी ठेकेदारी श्रीप्रसाद वराळे यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे. हे निवेदन महापालिका आयुक्तांसह जिल्हा पोलिस, लाचलुचपत प्रतिबंध विभाग (पुणे), मुख्यमंत्री यांना देण्यात आले आहे. महापालिकेत 85 लाखांचा घोटाळा केल्याचा आरोप माझ्यावर होत आहे; पण मी कोणताही घोटाळा केलेला नाही. शासकीय नियमाप्रमाणेच मला बिल मिळाल्याचा दावाही वराळे यांनी केला आहे. महापालिकेत आजवर मी केलेल्या 7 ते 8 कोटी रुपयांच्या कामासाठी टक्केवारी स्वरूपात 60 ते 65 लाख रुपये दिल्याचेही निवेदनात म्हटले आहे.
ज्या कामाचे 85 लाखांचे बिल काम न करता घेतल्याचा माझ्यावर आरोप होत आहे; परंतु या कामातील हे पाचवे बिल असून 72 लाख 16 हजार 396 रुपये मिळाले आहेत. या कामांपैकी जागेवर 800 एमएम पाईपचे 1125 रनिंग मीटर काम पूर्ण असून 18 चेंबर पूर्ण आहेत. 312 मीटर पाईप जागेवर उपलब्ध होत्या. जानेवारी ते मे 2025जसा कामाला वाव मिळेल तसे मी 70 ते 80 मीटर काम केले आहे. शेतकर्यांच्या विरोधामुळे हे काम थांबले. या कामाचे पैसे जाणार म्हणून या बिलामध्ये अॅडव्हान्स रक्कम अदा केली आहे. या निधीतील 93 लाख शिल्लक असून घोटाळा करायचा असता, तर सर्वच रकमेचा केला असता.
दुसर्या ठेकेदार व अधिकार्यांना वाचविण्यासाठी माझ्यावर भ्रष्टाचाराचा खोटा आरोप केला जात आहे. अधिकारी व एका ठेकेदाराकडून मला त्रास दिला जात असून मला व माझ्या कुटंबीयांना काही झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबादारी महापालिकेतील एक ठेकेदार व अधिकार्यांचीच राहील, असेही या निवेदनात म्हटले आहे.