

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) संलग्न 2,700 दूध संस्थांची दोन सदस्यीय समितीकडून चौकशी होणार आहे. प्रकाश बेलवाडे यांच्या तक्रार अर्जाची दखल घेत विभागीय उपनिबंधक (दुग्ध) राजकुमार पाटील यांनी चौकशी समितीची नेमणूक केली आहे. सांगलीच्या सहायक निबंधक दीपा खांडेकर चौकशी पथकप्रमुख म्हणून, तर जिल्हा विशेष लेखापरीक्षक ए. एस. पैलवान यांची सदस्य म्हणून नियुक्ती केली. चौकशी अहवाल तयार करून तत्काळ सादर करण्याचा आदेश पाटील यांनी दिला.
वडकशिवाले (ता. आजरा) येथील महादेव दूध संस्थेचे संचालक प्रकाश बेलवाडे यांनी 1,108 व दूध उत्पादन नसणार्या 212 दूध संस्थांची प्रत्यक्ष स्थळ पाहणी करावी, संस्थांचे सचिव, मापाडी, अभिलेख, ऑडिट आदी गोष्टी तपासून 2021 नंतरच्या दूध संस्थांच्या नोंदणी रद्दबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी पत्राद्वारे विभागीय उपनिबंधक यांच्याकडे केली होती. पत्राची दखल घेऊन तक्रारींची चौकशी करण्यासाठी बुधवारी (दि. 1) समितीची नेमणूक केली. समितीकडून 2021 नंतरच्या दूध संस्थांची पडताळणी होईल.
मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपाची चर्चा
तक्रार अर्जाची प्रत बेलवाडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही ई-मेलद्वारे पाठविली होती. विभागीय उपनिबंधकांनी बुधवारी एका दिवसात चौकशी समिती नियुक्त केली. त्यामुळे या प्रकरणात थेट मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप केल्याची चर्चा सहकार क्षेत्रात सुरू आहे.
2021 नंतरच्या सर्व दूध संस्था चौकशीच्या फेर्यात
जिल्ह्यात आजअखेर 6500 दूध संस्थांची नोंदणी झाली आहे. गोकुळच्या 2021 च्या निवडणुकीत सुमारे 3800 दूध संस्था मतदानास पात्र होत्या. 2021 नंतर आजअखेर सुमारे 2700 नव्या संस्थांची नोंदणी झाली आहे. यासर्व संस्था आता चौकशीच्या फेर्यात येणार आहेत.
नियमित प्रशासकीय पडताळणी प्रक्रिया
गोकुळ संलग्न दूध संस्थांच्या चौकशीसाठी नेमलेली समिती ही नियमित प्रशासकीय पडताळणीची प्रक्रिया आहे. गोकुळचे कामकाज नेहमीच शासन नियम व कायदेशीर तरतुदींच्या चौकटीत राहून पार पडलेले आहे. पडताळणीनंतर वस्तुस्थिती स्पष्ट होईल. समितीस गोकुळचे पूर्णत: सहकार्य राहिल. समितीकडून तपास पूर्ण करून अहवाल शासनाकडे सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील कार्यवाही केली जाणार आहे. सभासदांनी यासंदर्भात दिशाभूल करणार्या माहितीवर विश्वास ठेवू नये, असे गोकुळ चेअरमन नविद मुश्रीफ यांनी पत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.