

कोल्हापूर : मटेरियल सायन्स क्षेत्रामध्ये शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू व जागतिक कीर्तीचे संशोधक डॉ. पी. एस. पाटील यांचा देशातील आघाडीच्या दहा संशोधकांमध्ये समावेश झाला आहे. ‘रिसर्च डॉट कॉम’ या आंतरराष्ट्रीय स्तरावरील संशोधन मंचाने नुकतीच 2024 ची यादी जाहीर केली असून, त्यामध्ये डॉ. पाटील यांना मटेरियल सायन्समध्ये देशात नववे स्थान मिळाले आहे.
प्र-कुलगुरू डॉ. पाटील यांच्या नावावर 600 हून अधिक शोधनिबंध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय शोधपत्रिकांत प्रसिद्ध झाले आहेत. त्यांच्या संशोधनास अद्यापपर्यंत 33,880 हून अधिक सायटेशन्स मिळाल्या असून, त्यांचा एच-इंडेक्स 94, आय-10 इंडेक्स 540 आणि डी-इंडेक्स 88 इतका आहे. जागतिक क्रमवारीत त्यांना मटेरियल सायन्स क्षेत्रात 1,512 वे स्थान मिळाले आहे. त्यांच्या नावावर सात पेटंट आहेत, तर चार आंतरराष्ट्रीय संशोधनविषयक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थ्यांनी पीएच.डी. पूर्ण केली असून, अनेक पुरस्कारांनी गौरविले आहे. त्यांचा समावेश अमेरिकेच्या स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या टॉप दोन टक्के संशोधकांच्या यादीतही झाला आहे.