कोल्हापूर : गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता?’ हे पुस्तक छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख करून त्यांचा अवमान करणारे आहे. पुस्तकात अनेक घटना इतिहासाचे विकृतीकरण करून खोटा इतिहास बिंबवण्यासाठी लिहिण्यासाठी केल्या आहेत. यामुळे या पुस्तकावर तत्काळ बंदी घालावी आणि एकेरी उल्लेख न हटविणार्या प्रकाशक व संबंधित संस्थांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने शनिवारी छत्रपती शिवाजी चौकात आंदोलन करण्यात आले.
पुस्तकात शिवाजी महाराजांना भवानीदेवीने तलवार दिलीच नाही, असा उल्लेख असून हा प्रकार हिंदू अस्मितेचा पाया असलेल्या महापुरुषांचे वैचारिक खच्चीकरणाचा कट आहे. यामुळे या पुस्तकाच्या विक्री व वितरणावर बंदी घालावी. प्रकाशक व संबंधित संस्थांवर भारतीय न्याय संहिता कलम 299 अंतर्गत धार्मिक भावना दुखावणे, महापुरुषांचा अपमान करणे, कलम 196 अंतर्गत विविध गटांमध्ये तेढ निर्माण करून सामाजिक शांतता भंग करणे या कलमान्वये गुन्हे दाखल करावेत. राज्य शासनाने उच्चस्तरीय समिती नेमून या पुस्तकातील प्रत्येक आक्षेपार्ह विधानाचा व ऐतिहासिक संदर्भांचा अभ्यास करावा. छापील पुस्तकांबरोबरच अॅमेझॉन, फ्लिपकार्ट या सारख्या ई - कॉमर्स साईटस् आणि अन्य वेबसाईटवर उपलब्ध डिजिटल प्रति व पीडीएफ लिंक्स सायबर कायद्यांतर्गत ब्लॉक कराव्यात, अशीही मागणी यावेळी करण्यात आली. आंदोलनात रामभाऊ मेथे, शिवानंद स्वामी, सुनील सामंत, किशोर घाटगे, सतीश बिडकर आदी सहभागी झाले होते.
पोलिस अधीक्षकांना निवेदन
हिंदुत्ववादी संघटना व हिंदू राष्ट्र समन्वय समितीच्या पदाधिकार्यांनी पोलिस अधीक्षक कार्यालयात अपर पोलिस अधीक्षक डॉ. धीरजकुमार बच्चू यांची भेट घेऊन निवेदन दिले. ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकातून चुकीचा इतिहास पसरविला जात आहे. यामुळे जातीय सलोखा बिघडत असून कायदा- सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे संबंधितांवर तत्काळ गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी पदाधिकार्यांनी केली.