

कोल्हापूर : शासनाच्या शिक्षण क्षेत्रातील धोरणांविरोधात व प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी जिल्ह्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आक्रमक झाले आहेत. याचाच भाग म्हणून शुक्रवार, दि. 11 जुलै रोजी जिल्ह्यातील सुमारे 1,500 खासगी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा बंद राहणार आहेत. याच दिवशी दुपारी बारा वाजता दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा काढण्यात येणार असून, यात दहा हजारांहून अधिक कर्मचारी सहभागी होतील.
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळ, कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ, जिल्हा संस्था चालक संघ आणि कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या नेतृत्वाखाली हा महामोर्चा काढण्यात येणार आहे. या आंदोलनात सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष एस. डी. लाड, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष राहुल पोवार व सचिव आर. वाय. पाटील यांनी केले आहे.