

कोल्हापूर : प्रामुख्याने गोरगरीब जनताच खासगी सावकारांच्या दावणीला बांधलेली दिसत आहे. ‘मुकी बिचारी कुणी हाका’ या न्यायाने वर्षानुवर्षे हे गोरगरीब सावकारीच्या चरकात अडकून पिळून निघत आहेत, पण कुणी वाली नसल्याने ही जनता मुकाटपणे सावकारांचा जाच सहन करीत आहे.
एकट्या कोल्हापूर शहरात हातगाड्यांवर किंवा रस्त्यांवर बसून व्यवसाय करणारे पाच हजारहून अधिक छोटे व्यावसायिक आहेत. या लोकांची दिवसभराची मिळकत फार फार तर शे-पाचशेच्या घरात असते. मात्र भांडवलाअभावी यातील बहुतांश छोटे व्यावसायिक कित्येक वर्षांपासून सावकारी पाशात अडकलेले दिसतात. सकाळी सावकाराकडून हजार-दोन हजार रुपये घ्यायचे आणि त्याच पैशातून व्यवसाय सुरू करायचा. संध्याकाळी सावकाराला मुद्दल आणि दहा टक्के व्याज द्यायचे, अशी इथली पद्धत आहे, म्हणजे अवघ्या बारा तासांसाठी मुजोर सावकार या लोकांकडून 10 टक्के व्याजाची आकारणी करतात. शहरातील या छोट्या व्यावसायिकांची दिवसाची उलाढाल एक ते दीड कोटी रुपयांच्या घरात आहे, म्हणजे तेवढीच सावकारांचीही उलाढाल आहे. या मंडळींकडून सावकार दिवसाला 10-20 लाख निव्वळ व्याजाची आकारणी करतात. एखाद्याचा धंदा नाही झाला तरी व्याज चुकत नाही. त्यामुळे शहरातील हजारो छोटे व्यावसायिक सावकारी चरकात पिचत पडलेले दिसतात. थोड्या-फार फरकाने जिल्हाभर असेच चित्र आहे. जिल्हाभरातील या ‘मायक्रो सावकारी’ची दिवसाची उलाढाल किमान तीन-चार कोटीच्या घरात आहे. वर्षाचा विचार केला तर हजार-दीड हजार कोटी रुपयांची ही खासगी सावकारी आहे.
जिल्ह्यातील वेगवेगळ्या संस्थांमधील चतुर्थश्रेणी कामगार मोठ्या प्रमाणात खासगी सावकारांच्या पाशात जखडून गेलेले दिसतात. या बाबतीत कोल्हापूर महापालिकेतील कामगारांचे उदाहरण पुरेसे बोलके आहे. महापालिकेतील बहुतांश चतुर्थश्रेणी आणि कंत्राटी कामगार खासगी सावकारीत गुरफटून गेलेले दिसतात. या कर्मचार्यांचे बँक पासबुक, एटीएम कार्ड हे सगळे काही खासगी सावकारांकडेच गहान पडले आहे.
पगार झाला की सावकार लोक कर्जदार कर्मचार्याच्या खात्यातून परस्पर कर्जाची रक्कम आणि व्याजाची रक्कम काढून घेतात. त्यामुळे या कर्मचार्यांना पुन्हा महिनाभराचा घरखर्च भागविण्यासाठी त्याच त्याच सावकारांपुढे हात पसरण्याशिवाय पर्याय राहत नाही. त्यामुळे हे कर्मचारी दिवसभर एवढे काबाडकष्ट आपल्या लेकरा-बाळांसाठी करतात की सावकारांची पोटे भरण्यासाठी करतात, असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.
दिवसभर मिळेल ते काबाडकष्ट करून पोटपाणी सांभाळणार्या रोजंदारांची संख्या कमी नाही, पण या मंडळींना रोजच्या रोज रोजगार मिळेलच याची शाश्वती नाही. प्रामुख्याने औद्योगिक वसाहतींमध्ये अशा रोजंदार कामगारांची संख्या मोठी आहे. ज्या दिवशी काम मिळत नाही, त्या दिवशी या लोकांना नाईलाजास्तव सावकाराचा उंबरठा चढावा लागतो आणि पुढे त्यांच्यावर सावकारासाठीच राबण्याची वेळ येते. औद्योगिक वसाहतीतील अनेक कामगार कुटुंबे वर्षानुवर्षे सावकारांच्या कचाट्यात सापडलेली दिसतात.
सावकारांच्या पाशात अडकलेल्या शेकडो कुटुंबांनी या सावकारी पाशातून सुटण्यासाठी पलायन केलेले दिसते. मात्र, पलायन केलेल्या कुटुंबाच्या शोधासाठी सावकारांची पाळीव सेना अहोरात्र भटकते. पळून गेलेल्या अनेक कुटुंबांना सावकारांच्या लोकांनी शोधून काढून पुन्हा जणू काही आपल्या नजरकैदेत ठेवल्याचीही उदाहरणे दिसून येतात.
सावकारांच्या पाशात अडकलेल्या गोरगरीब कुटुंबांची रोजची हाता-तोंडाची गाठ पडणे मुश्कील बनले आहे. पोटाची खळगी भरण्याच्या मागे लागलेली ही मंडळी कधीही सावकारांविरुद्ध, त्याच्या पिळवणुकीविरुद्ध तक्रार करण्याच्या मनःस्थितीत नाहीत. परिणामी, सावकार दिवसेंदिवस उद्दाम बनत चालले आहेत. अशा परिस्थितीत पोलिस आणि सहकार खात्यानेच जिल्ह्यातील खासगी सावकारांविरुद्ध स्वयंसिद्ध अशी मोहीम चालू करण्याची आवश्यकता आहे, त्याशिवाय या खासगी सावकारांना अटकाव लागूच शकत नाही. आयकर विभागानेसुद्धा जिल्ह्यातील खासगी सावकारांचा पिच्छा पुरविण्याची आवश्यकता आहे.