

कोल्हापूर : खुनाच्या गुन्ह्यात कळंबा कारागृहात जन्मठेप भोगणार्या कैद्याने पळविलेली मोटार जुना राजवाडा पोलिसांनी रविवारी सकाळी वैभववाडी (जि. सिंधुदुर्ग) येथून ताब्यात घेतली. पलायन केलेल्या सुरेश आप्पासाहेब चौथे (वय 38, रा. चौथेवाडी, ता. गडहिंग्लज) हा गोव्याकडे पसार झाला असावा, असा पोलिसांचा संशय आहे. पोलिसांची पथके सायंकाळी गोव्याकडे रवाना झाली आहेत.
कळंबा मध्यवर्ती कारागृहाजवळ असलेल्या कार वॉशिंग सेंटरवरून मोटारीसह पळालेल्या कैद्याने वैभववाडी येथील भाजी मंडईत कार बेवारस स्थितीत सोडून दिल्याचे निष्पन्न झाले होते. जुना राजवाडा पोलिसांच्या पथकाने रविवारी सकाळी मोटार ताब्यात घेतली. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे कैदी चौथे याने गोव्याकडे धूम ठोकली असावी, अशी शक्यता गृहित धरून पोलिसांची पथके सायंकाळी गोव्याकडे रवाना झाल्याचे सांगण्यात आले.