

यड्राव : इचलकरंजीतील बनावट नोटा प्रकरणातील ‘मास्टरमाईंड’ अर्जुन दळवी यानेे जामीन मिळाल्यानंतर पुन्हा कलर प्रिंटरवर 200 रुपयांच्या बनावट नोटा छापल्या. या नोटा महाराष्ट्र व कर्नाटक राज्यांत खपविल्या. शहापूर येथे एकाच टपरीवर दोनदा बनावट नोटा खपवताना संशय आल्यामुळे या टोळीचा पर्दाफाश झाला. यातील चौघांच्या मुसक्या आवळल्या आहेत.
इचलकरंजीतील मोठे तळे या ठिकाणी अर्जुनच्या वडिलांचा वडापावचा व्यवसाय आहे. बारावीनंतर अर्जुन वडिलांना व्यवसायात मदत करीत होता. झटपट पैसे मिळविण्याच्या हव्यासापोटी त्याला कलर प्रिंटरवर बनावट नोटा छापण्याची कल्पना सुचली. मित्र ओंकारला मदतीला घेऊन बनावट नोटा छापून वितरित करताना दोघांना पकडले. त्यांच्यावर फेब—ुवारी 2024 मध्ये गावभाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. जामिनावर बाहेर आल्यानंतर त्यांनी जानेवारी 2025 मध्ये पुन्हा बनावट नोटा छापण्याचा निर्णय घेतला. मित्राकडून कलर प्रिंटर आणला. तो प्रिंटर ओंकारच्या घरी ठेवला. ओंकारची आई कामावर गेल्यानंतर सकाळी प्रिंटरवर छापाई केली.
या नोटा बाहेर बाजारात खपविण्यासाठी त्यांनी अवधूत पोवार व प्रमोद पोवार या दोघांना 20 टक्के कमिशनवर नोटा खपवण्यासाठी दिल्या. शहापुरात एकाच टपरीवर दोनशे रुपयाची नोट देऊन 20 रुपयांची सिगारेट घेऊन उर्वरित 180 रुपये परत घेण्याचा प्रकार दोन वेळा घडल्यामुळे हे प्रकरण उजेडात आले. टपरी मालकाकडून दोन, संशयितांच्या अंगझडतीतून आठ यासह घटनास्थळावरूनही काही नोटा जप्त केल्याचे पोलिसांनी सांगितले. वर्षात दोन वेळा अर्जुन बनावट नोटा छापून वितरित करतो मग इचलकरंजी शहरातील शिवाजीनगर, गावभाग, शहापूर पोलिस ठाण्यांची डीबी पथके, जिल्ह्याचे गुन्हे शोधपथक (एलसीबी) यांसह दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) हे काय करत होते, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
अर्जुन दळवी व ओंकार साळुंखे हे एकमेकाचे जवळचे मित्र असून पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर गाव भाग पोलिस ठाण्यात 2022 ला प्राणघातक हल्ला (खुनाचा प्रयत्न), 2023 ला मारामारी, 2024 ला बनावट नोटा छापणे व त्या वितरित करणे असे गुन्हे दाखल आहेत.