

कोल्हापूर : शाळेतील माजी विद्यार्थीनी असलेल्या अल्पवयीन मुलीच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन लैंगिक अत्याचार करणार्या मुख्याध्यापकाला जुना राजवाडा पोलिसांनी बेड्या ठोकल्या. कृष्णा ज्ञानू दाभोळे (वय 55, रा. कागल) असे त्याचे नाव आहे. न्यायालयाने त्यास तीन दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.
पोलिस सूत्राकडून सांगण्यात आले की, पीडित मुलीची आई कोल्हापूर येथे राहण्यास आहे. काही दिवसांपूर्वी आईची प्रकृती बिघडली. तिच्या देखभालीसाठी मुलगी कोल्हापूरला आली. संशयित मुख्याध्यापक कृष्णा दाभोळे याने आईच्या तब्बेतीची विचारपूस करण्याच्या बहाण्याने मुलीशी संपर्क वाढविला. ऑगस्ट 2025 मध्ये तो पीडित मुलीच्या घरी आला. घरात कोणीही नसल्याची संधी साधून त्याने तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर मुलाच्या फ्लॅटवर बोलावून घेत तेथेही पुन्हा अत्याचार केला.
काही दिवसानंतर मुलीच्या वागण्यात झालेला बदल पाहून आईने तिला विश्वासात घेतले. मुलीने मुख्याध्यापकाने अत्याचार केल्याचे सांगितल्यानंतर घरातील सर्वांना धक्का बसला. पीडितेच्या आईने पोलिस अधीक्षक आणि महिला कक्षाकडे तक्रार केली.
पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी घटनेची दखल घेत संशयितावर गुन्हा दाखल करून अटक करण्याचे आदेश दिले. राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होताच मुख्याद्यापक कृष्णा दाभोळेला मुरगूड (ता. कागल) येथून अटक करण्यात आली. न्यायालयाने त्यास तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. संशयिताविरुद्ध बालकावरील लैगिंक अत्याचारापासून प्रतिबंध अधिनियम तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.